Changing Purvanchal
ईशान्य भारत म्हटले की हिरव्यागार डोंगर दर्यांचा,अनघड रस्त्यांचा,शेकडो भाषा,विविध जनजातींचा, रंगीबेरंगी,ओबडधोबड, तरीही अतिशय रेखीव,सुबक अश्या नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या दागदागिन्यांची परंपरा असणारा,छोटे डोळे,उंच गालफडे अशी दक्षिण आशियायी, मंगोलियन चेहरेपट्टी अभिमानाने मिरवणाऱ्या लोकांचा प्रदेश डोळ्यासमोर येतो.यात अरुणाचल प्रदेश, मेघालय,मणिपूर,मिझोराम,नागालँड,त्रिपुरा, आसाम आणि सिक्कीम या आठ राज्यांचा समावेश होतो. ईशान्य भारत गेली अनेक दशकेच नव्हे तर अनेक शतके भारताच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला प्रदेश आहे. .
स्वातंत्र्यानंतरही बफर स्टेट म्हणजेच आघात किंवा धक्काप्रतिबंधक राज्य म्हणूनच या प्रदेशाकडे पहिले गेले.म्हणूनच सामाजिक,आर्थिक सुधारणांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेली अशी ही राज्ये आहेत.आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत ईशान्य भारताला कृष्ण विवराची उपमा दिली जाते. ज्याप्रमाणे कृष्ण विवरात जाणारी कोणतीही गोष्ट परत येऊ शकत नाही तसेच केलेल्या गुंतवणुका फायद्याच्या दृष्टिकोनातून निरुपयोगी ठरतात अशी एक भावना गुंवणूकदारांच्या वर्तुळांमध्ये आहे. निरंतर संघर्ष, भौगोलिक विलगता, सीमावर्ती प्रदेश असल्यामुळे इथे होणारे सैन्यीकरण,त्यांच्या कारवाया,करावे लागणारे स्थानांतरण इत्यादी अनेक अडचणींमुळे येथे येणारी गुंतवणुकीची गंगाजळी आटली आहे.परिणामी गुंतवणुकींशी जोडून येणाऱ्या सुधारणांपासून हा समाज वंचित राहिला आहे.
नैसर्गिक सौंदर्य आणि संपत्तीची भरमार असणारा हा भूभाग खरंतर गुंतवणुकीसाठी अगदी आदर्श आणि आकर्षक प्रदेश आहे.
परंतु ईशान्य भारत भौगोलिक दृष्ट्याही असुरक्षित असा प्रदेश आहे.आसाम सोडता सर्व राज्यांच्या जवळजवळ ९८% बाह्यसीमा आंतरराष्ट्रीय आहेत. बांगलादेश, चीन, म्यानमार, भूतान, नेपाळ या देशांच्या सीमा या राज्यांशी भारताला मिळतात. त्यामुळेच विविध प्रकारच्या तस्करींचे हे मध्यवर्ती ठिकाण बनण्याची भिती निर्माण होते. मानवी तस्करी,गायी गुरे,शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ अश्या अनेक प्रकारच्या तस्कर्या करण्यासाठी हा मध्यमार्ग होतो.बांग्लादेशी घुसखोरांचा उपद्रवही होत असतोच.
भारत सोडण्यापूर्वी इंग्रजांनी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने काम करून भारतात ठिकठिकाणी फुटीरतावादाची बीजे रोवून ठेवली. पुर्वांचलातील छोटे मोठे अनेक सक्रीय आतंकवादी गट त्या विषवेलींचीच फळे आहेत. यात नागा फाँर ख्राईस्ट,मिझोराम चे मिझो नेशन,बोडो अतिरेकी आणि असे अनेक गट येतात.यांना परदेशातून सर्व प्रकारची मदत मिळते.
अशिक्षितता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आत्यंतिक गरिबी अंधश्रद्धांच्या विळख्यात अजुनही इथला समाज पिचला जात आहे.आणि त्यालाच जोडून अजून एक भयानक संकट पुर्वांचलाची पवित्रता,शांतता नासवून टाकत आहे. ते म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर घडवून आणले जाणारे धर्मांतर। धर्मांतरासाठी म्हणून परदेशातून येणारा पैसा परकीय शक्तींना येथे जणू मुक्त संचाराची वाट मोकळी करून देतो.नागालँड आणि मिझोराम या अश्याच नासूर बनलेल्या जखमा आहेत.अशी सगळी अतिशय खडतर आणि कठीण परिस्थिती पुर्वांचलात अनुभवास येते.
परंतु अश्या अवघड परिस्थितीतही काही आशेचे किरण, समाधानाची बेटे समोर येतात.अश्या काही संस्था,संघटना आहेत ज्यांना आपण अतिशय कुर्मगतीने का होईना पण बदलणार्या,सुधारणार्या,जाग्या होणाऱ्या ईशान्य भारताचे शिल्पकार म्हणू शकतो.
काही राष्ट्रवादी विचारांच्या सामाजिक भान असलेल्या विचारवंतांना ही सगळी परिस्थिती, त्याचे दुष्परिणाम स्वातंत्र्योत्तर काळात प्रकर्षाने जाणवू लागले. त्यामुळे या आघातांना रोखण्यासाठी, इथे राष्ट्रीय विचारांची मजबूत फळी उभी करण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीनी प्रयत्न करू लागले.पूर्वांचलात एक विचार, परंतु विविध नावे असणाऱ्या अनेक संस्था मूळ धरू लागल्या. इथल्या छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांनी आपल्या सेवाभावी कामाचे जाळे पसरवले. इशान्य भारताची तरुणाई भारतीय रंगांत रंगु लागली. आपल्या आसपासच्या परिस्थितीचा सजगपणे विचार करु लागली.विविध प्रकारे सामाजिक, धार्मिक, व आर्थिक द्रुष्ट्याही प्रगतीशील विचारधारेकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. परधर्माचे आक्रमक, अंतर्गत असामंजस्य अश्या अनंत अडचणी आहेत.तरीही आपली नैसर्गिक आणि स्वधर्माधिष्ठित जीवनशैली intact ठेवून,नवीन पिढी, होणाऱ्या जागतिक,सामाजिक बदलांचे स्वागत करण्यात, हळूहळू का होईना पण यशस्वी होते आहे; ही अतिशय कौतुकास्पद अशीच बाब आहे.
वर म्हटल्याप्रमाणे ही सर्व राज्ये आंतरराष्ट्रीय द्रुष्टीनेहि महत्वपूर्ण आहेत. सीमावर्ती प्रदेश असल्याने इथे सैन्यतळ मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचाही फायदा इथे शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी होत असतो.
शिक्षणाचा वाढता टक्का आणि हळूहळू सुधारत जाणारी गुणवत्ता याचाही सुपरिणाम या समाज जीवनावर जाणवतो.या आणि अशा प्रकारच्या सकारात्मक प्रवाहांमुळे बाकी भारताप्रमाणेच इशान्य भारतही राजकीय स्थित्यंतरे अनुभवत आहे.या समाजाला भारताच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणारा,पारदर्शकता आणि प्रगती हे मुख्य मुद्दे घेऊन राजकारण करणारा पक्ष पूर्वांचलचे मन जिंकण्यात यशस्वी होत आहे.वेगवेगळ्या सुधारणांचा श्री गणेशा होतो आहे.
मणीपूर सारख्या राज्यात जिथे महिन्यातील 20 दिवस बंद पाळला जात असे तिथे या घटना आता अगदीच तुरळक होत आहेत.त्रिपुरा त्या मानाने स्थीर आणि प्रगत राज्य आहे.मेघालय एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे.जोडीला आसाम आहेच.तर मणीपूर सरकारने आरोग्य विषयक सर्व सुविधा उपलब्ध करून आजूबाजूच्या देशांमधील गरजुंचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे.
ठिकठिकाणी नवीन रस्ते,पुल बांधणीची कामे वेगाने सुरू आहेत असे निदर्शनास येते.विमानतळ निर्माण प्रकल्प आकार घेत आहेत. कुठे सीमांचे demarkation केल्या जात आहे.तर कुठे चांगल्या प्रतीचे युद्ध तळ आणि सैन्यासाठी म्हणून रस्ते निर्मिती होते आहे.युद्ध व आंतरराष्ट्रीय संबंध नितींमध्ये कणखर भुमिका स्विकारून, त्याप्रमाणे हालचाली करणाऱ्या सरकारचे हे यश आहे.डोकलाम येथे मिळालेले यश हे या रणनीती चे उत्तम उदाहरण आहे.
भारत - जपान यांच्यातील अँक्ट ईस्ट पाँलिसी नुसार येथे आता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जापनीज गुंतवणूक सुरू होवू शकते. मानवी अदलाबदली कार्यक्रमाअंतर्गत इथल्या होतकरू, हुशार तरुणांना नशीब अजमावायला जपानचा मार्गही खुला होतो आहे.
अरुणाचलात मुलनिवासी धर्म आणि culture preserve करण्यासाठी, वाढवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे.बदलाचे वारे तर वाहू लागले आहेत, मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसू लागायला अजून काही काळ जावा लागेल. बदल आणि सुधारणा स्विकारण्यासाठी समाजाचीही तशी मानसिकता तयार व्हावी लागते हेही लक्षात घ्यायला हवे ना!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा