चायबागान



#NorthEast_diaries


आजची गोष्ट आसामची. गेली दोन-पावणेदोनशे वर्षे आसाम मधे राहुनही परक्या समजल्या जाणाऱ्या ‘चायबागान tribe’ ची.त्यांचा इतिहास, सद्य परिस्थिती याविषयी थोडे जाणून घेऊ.

आपण जो चहा पितो, तो पिकवणाऱ्या मळ्यांमधे काम करणारे हे लोक. या चहाच्या मळ्यांनी आणि या लोकांनी साऱ्या पूर्वोत्तर भारताला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक प्रचंड मोठा स्रोत निर्माण करून दिला आहे. आज ईशान्य भारतातील सर्वाधिक आय चहा उद्योगातूनच होतेय. "कुली", "बंगाली", "बगानिया", "साउताल", "संथाल", "झारखंडी", "उडिया", "आदिवासी" अश्या वेगवेगळ्या नावांनी या समाजाला ओळखले जाते.परंतु भारतभरातील परंपरा लक्षात घेऊन आपण त्यांच्या 'भाषेवरून' त्यांची ''सदानी समाज'' अशी सन्माननीय ओळख करून घेऊ.

इतिहास:-

दोन अडिचशे वर्षांपूर्वी, तिबेटचा चहा लोकांना आवडू लागला तशी, व्यापारी वृत्तीच्या इंग्रजांची नजर चहासाठी योग्य जमीन शोधू लागली. तशी जमीन आसाम मध्ये आहे हे लक्षात येताच तिबेटी मजूर शोधून त्यांनी तिथे चहाबागांची लागवड सुरु केली. पण इथल्या अ-सम आणि दलदल जंगलयुक्त जमिनीला, मलेरिया, सिकलसेल, टीबी सारख्या भयंकर रोगांना भिऊन, तिबेटी मजूर पळून गेले. नंतर ब्रिटिशांनी त्यावेळचा बर्मा म्हणजे आजचा मायन्मार येथून मेहनती मजूर बोलावले. त्यांचाही येथे टिकाव लागला नाही. त्याच सुमारास भारतातून त्रिनिदाद-टोबॅगो, दक्षिण आफ्रिका, मौरिशस, फिजी वगैरे देशात मोठया प्रमाणावर मजुरांना "कुली" म्हणून फसवून नेले जात होते. तेथे मात्र त्यांना गुलामाप्रमाणे वागविले जायचे. आसामात ही ब्रिटिशांनी हाच प्रयोग करायचे ठरविले आणि त्यानुसार भिन्न भिन्न प्रांतांतून गरीब लोकांना फसवून, धाकदपटशा दाखवून अथवा प्रलोभने देऊन मोठ्या संख्येत येथे आणले गेले.

याची सुरवात ई. स. 1840 ते 1850 या दशकात झाली. आधीच्या अनुभवातून शहाणे होऊन हे कुली पळून जाऊ नये याची व्यवस्था केली गेली. रस्त्यात लागणाऱ्या नद्यांच्या घाटांवर चेकपोस्ट लावल्या गेल्या. कोणी पळून जाताना पकडला गेला तर सर्वांसमोर कठोर शिक्षा दिली जाऊ लागली. दोन वेगवेगळ्या राज्यांतील स्त्रीपुरुषांना एकत्र राहणे बंधनकारक केले. आसामातील स्थानिक समाजा बरोबर हे लोक समरस झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते हे ध्यानात ठेवून या मजुरांना प्रयत्नपूर्वक इतरांपासून दूर ठेवले गेले. हे चटकन ओळखू यावेत म्हणून यांच्यावर गुडघ्याखाली काही वस्त्र घालण्यास आणि पायात पादत्राणे घालण्यास बंदी घातली. (आज देखील इथल्या काही वस्त्यात असे मजूर बघायला मिळतील).

एवढे उपाय करूनही मजुरांचे पलायन थांबत नव्हते. दिवसभर काम करून संध्याकाळी उपलब्ध असलेलं भोजन पटकन आटोपून पडत असलेल्या अंधाराचा फायदा घेत नेफा (आजचा अरुणाचल), भूतान, सिक्कीम मार्गे पळण्याचे तुरळक प्रयोग चालूच होते. हे प्रकार वाढल्यास पलायनाचा नवीन मार्ग तयार होईल हे लक्षात घेऊन मालकांनी आपले शेवटचे अस्त्र वापरले. दिवसभर कठोर मेहनत करून परतलेल्या मजुरांसाठी भोजन तयार नसायचं. उपलब्ध असायची भरपूर दारू. थकल्या भागल्या जीवांना मग त्याचाच आधार वाटायचा. नशा चढल्यावर कसेबसे चार घास खाऊन मंडळी आडवी व्हायची. आता पळायची कोणाला शुद्ध! हळूहळू दारूचं व्यसन पद्धतशीररित्या भिनवलं गेलं. त्यासाठी फूट पाडून काही लोकांना लालूच दाखवून हाताशी धरलं. दारूशी संबंधित प्रथा प्रचलित केल्या गेल्या. त्या व्यवसायात काहींना गुंतवलं. आता मात्र मालकांना हवा तसा गुलाम समाज तयार झाला.

विविधभाषी मजूर आपसात मिसळून गेले. एक बोलचालीची भाषा तयार झाली. हीच ती "सदानी" भाषा. यात अनेक भाषांचे शब्द मिसळलेत. मराठीतील सर्वमान्य "आहे" हा शब्द इथे त्याच अर्थाने वापरला जातो. ("तियान बेसी जहाल आहे" म्हणजे "भाजी जास्त तिखट आहे"). अगदी "चावला" "पोळला" सारखे शब्द आम्ही "चाबला" "पोडला" म्हणून वापरतो. आंब्याला आंबाच म्हणतो, आम नाही. चहाला चहाच म्हणतो, चाय नाही.

या समाजात अनेक आडनावं आहेत. सध्या असम सरकारनी मान्यता दिलेल्या आडनावांत "मुंडा-उरांग-खडीया-साहू-शाह-कलांदी-तांती-कर्मकार-नायक-खैरवार-मोदी-तेलंगा-बावरी-सिंग-बडाईक-कुर्मी" वगैरे 92 नांवे आहेत. यावरून अंदाज लावल्यास या समाजातील लोक तेलंगणा, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, बिहार व बंगाल या राज्यांमधून आले असावेत असे वाटते.आता असम हेच या समाजाचे मूळ स्थान, सदानी ही भाषा आणि करमपूजा-बिहु-होळी-दिवाळी-कालीपूजा-शिवरात्रि-रामनवमी-राखीबंधन वगैरे सण मनविणारी स्वाभाविक पणे आलेली भारतीय संस्कृती हीच या समाजाची मुख्य संस्कृती आहे.

तर, हळूहळू आसामात चहाच्या मळ्यांचा विस्तार वाढत गेला. चहाच्या विक्रीतून ब्रिटिश मालकांची आर्थिक शक्ती वाढत होती, तर अशिक्षा-गुलामी-व्यसनाधीनता यातून आमच्या लोकांची शारीरिक-बौद्धीक-मानसिक शक्ती घसरणीला लागली होती. समाज पूर्णतः पराधीन होऊ लागला होता. अनेक दशके ही प्रक्रिया चालू होती.अशातच जमीन कसून तयार झाल्यावर, चहाचे मळे तयार झाल्यावर एवढ्या मोठ्या संख्येत मजुरांची आवश्यकता उरली नाही. मग त्यांना चहा मळ्यांच्या आसपास पडीक जमिनीवर झोपड्या बांधून स्वतःपुरती शेती करायला परवानगी देण्यात आली. त्यांना मालकांनी आपल्या संरक्षणातच ठेवलं. याची दोन कारणं होती. एक म्हणजे यांनी जवळपासच्या गावातील मूलनिवासी असामी समाजाशी मिसळून जाऊ नये (अन्यथा स्वाधीनता संग्रामात स्थानिक लोकांचे संख्याबळ वाढेल आणि ब्रिटिश राजसत्तेला धोका निर्माण होईल) आणि दुसरे म्हणजे वर्षातील 4-5 महिने चहापत्ती वेचण्यासाठी मोठ्या संख्येत आवश्यक असलेल्या मुली-स्त्रिया सहजपणे उपलब्ध असाव्यात.

बाहेरच्या समाजापासून यांना पूर्णपणे अलग ठेवण्यासाठी त्यांचे घड्याळ सुध्दा निराळे, एक तास पुढे ठेवले गेले. ज्यावेळी अन्यत्र सकाळचे पांच वाजत तेंव्हा चायबगान मध्ये सहा वाजल्याचा सायरन होई. सकाळी सात वाजता म्हणजे आमच्या वेळेनुसार आठ वाजता कामावर हजर व्हावे लागे. येथील लवकर होणाऱ्या सूर्यास्तामुळे दुपारी 3 वाजता म्हणजे आमच्या 4 वाजता सुटी होत असे. अजूनही अनेक चहाच्या मळ्यात आमचे बांधव याच वेळा समजतात. चहा मळ्यांचे एक वेगळेच जीवन, एक वेगळीच दुनिया असते.बाहेरच्या लांब विजारी (फुलपॅण्ट) वा पायघोळ धोतर नेसलेल्या लोकांशी संपर्क आलाच तर भीतीने या लोकांच्या तोंडून शब्द फुटत नसे.

दबलेला, मनाने खचलेला समाज आपला आत्मविश्वास, आपली विचारशक्ती गमावून बसतो. असा समाज स्वतःला कमजोर व इतरांना शक्तिशाली मानू लागतो. दैवावर विसंबून परिस्थितीशी तडजोड करतो आणि त्या परिस्थितीच्या समर्थनार्थ पळवाटा शोधू लागतो. भारतीय समाजात सुद्धा एकेकाळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुगल राज्यात हिंदवी स्वराज्याची कल्पना करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जिजामाता आणि शिवराय जन्माला यावे लागले.

आजची स्थिती:-

स्वातंत्र्योत्तर काळात,ब्रिटिश मालकांनी काही जमिनी निष्ठावान गुलामांच्या नावे करून दिल्या. आसामात सुसंस्कृत आसामी समाज, सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राबल्य असणाऱ्या बंगाली भाषी लोकांशी आणि व्यापार उदिमात जम बसविलेल्या राजस्थानी समाजाशी स्पर्धा करून पुढे येण्यासाठी धडपडत होता. येथील अहोम, बोडो, कारबी, नेपाळी वगैरे जनजातीय लोक आसामी समाजाबरोबर स्थान मिळविण्यासाठी धडपडत होते. अशा स्थितीत या नेतृत्वविहीन सदानी समाजाकडे बघायला कोणाला फुरसद मिळणार? यांची चहा मळ्यातली कामे संपली होती. सुधारणांशी संपर्क नसल्याने या समाजात फक्त दोनच गोष्ट झपाट्याने वाढत होत्या, त्या म्हणजे लोकसंख्या आणि रोगराई. आता या लोकांबद्दल आकर्षण वाटावं/ प्रेम वाटावं अस काहीच उरल नव्हतं. उपलब्ध होता तो मोठ्ठया संख्येतील गुलाम समाज, ज्यातील काही जण नावापुरते जमीनदार होते. बाह्य समाजातील लोकांच्या नजरे पुढे दिसू लागल्या त्या केवळ या जमिनी आणि सहजपणे उपलब्ध होऊ शकणारा प्रचंड मोठा मजूर समाज.

आज पूर्वोत्तर भारतात सदानी समाज लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अरुणाचल, नागालँड, मिझोराम सारख्या राज्यांच्या लोकसंख्येच्या *काही पट* यांची लोकसंख्या आहे. पण हा समाज अर्धमानवीय जीवन जगतोय. विविध कारणांमुळे अकालमृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे. सर्वसाधारण आयुष्यमान ही 50 वर्षांच्या आसपास असावे. चारसहा महिन्यांपूर्वी आसामात शिरलेल्या बांग्लादेशीला स्वीकारणाऱ्या समाजात 'सदनींना' पावणे दोनशे वर्षांनंतरही बाहेरचे म्हणणाऱ्याची संख्या भरपूर आहे.

या समाजात सुशिक्षितता, गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षणाची प्रचंड वानवा आहे. साक्षरतेचं प्रमाण नगण्य आहे. त्यामुळेच या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांचे वर्णन अंगावर काटा उभा करणारे आहे.वोट बँक असल्याने राजकीय आणि मजदूर नेतृत्व यांच्यातील व्यसनाधीनतेचा फायदा घेत थोड्याश्या भिकेवर यांना झुलवीत राहिले आहेत.त्यातल्या त्यात सांगण्यासारखी सुखद बातमी म्हणजे सोनोवाल सरकारने यांचे न दिल्या गेलेल्या मजुरीचे, त्यांच्या हक्काचे २०० कोटी रूपये देण्याचेे गेल्या महिन्यात घोषित केले आहे.

आता आधुनिक उपकरणांमुळे बरीचशी माहिती येथील युवकांना मिळू लागली आहे. विदेशात गेलेले *कुली* जर स्थानीय समाजाबरोबर पुढे येऊ शकतात तर आम्ही का नाही? असा प्रश्न त्यांना पडतोय. आपल्या एवढ्या मोठ्या संख्येतील समाजासाठी 'चांगले शिक्षण देणारी "नवोदय विद्यालया" सारखी एक तरी संस्था' असावी, साऱ्या आसामातून निवड करून त्यात विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळावा, त्यातून आपल्या समाजाचे योग्य मार्गदर्शन करणारे नेतृत्व उभे राहावे, आपल्या संख्याबळाच्या आधारावर पूर्वोत्तर भारतातील विदेशी समस्येला उत्तर देता यावं, या क्षेत्राच्या विकासात आपणही अन्य समाजांच्या बरोबर खांद्याला खांदा भिडवून सहभागी व्हावं अशा आकांक्षा नवीन पिढीतील युवकांच्या मनांत जागृत होत आहेत.

इथे तुटपुंज्या साधनांत आपले आयुष्य वेचणारे, गेली चाळीस वर्षे इथे एका झोपडीत राहून या समाजासाठी तन, मन, धन वेचणारे श्री. अशोकजी वर्णेकर आणि त्यांच्या पत्नी म्हणतात, “सामाजिक संस्थांकडून अपेक्षा एवढीच कि आमच्या कडे दयेच्या दृष्टीकोनातून भिकेचा तुकडा न टाकता आम्हाला आत्मसन्मानाने जगण्यास मदतीचा हात द्या. मोदींनी येथील भाषणांमध्ये पुन्हा एकदा आशेचा जागृत केलाय, तो टॉर्च न ठरो एवढीच सर्वशक्तिमान परमेश्वरापुढे प्रार्थना आहे.”

#अमिता

*सदानी समाजाविषयी अधिक माहिती:*

पूर्वोत्तर भारतात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या समाजा बद्दल अजून थोडे. हा समाज बोडो, कारबी सारख्या अन्य जनजातींप्रमाणे सीमित क्षेत्रात सामावलेला नसून संपूर्ण आसाम भर (आता अन्य राज्यात ही) विखुरलेला आहे. याची संख्या लक्षात घेण्यासाठी पुढील तुलना पहा.सदानी समाजातील केवळ मतदारांची संख्या 40 लाखावर आहे. या समाजात अजून पर्यंत कुटुंब नियोजनाचा विशेष प्रचार न झाल्याने मुलांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे एकूण संख्या 80 ते 90 लाख असावी.

वेळोवेळी नॉर्थ ईस्ट मध्ये भारत विरोधी चळवळी उभ्या राहिल्या. प्रसंगी येथील सर्वसामान्य लोकांनी ही त्यांचे समर्थन केले होते. परंतु सदानी समाज मात्र सदैव भारताशी एकनिष्ठच राहिलाय.

असे म्हणतात कि भुसभुशीत जमीन दिसली की लोक कोपराने ही माती खणू लागतात. हा समाज तर सर्वात सॉफ्ट टार्गेट होता. गोड बोलून, प्रलोभने, भीती दाखवून वा फसवून स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी यांच्या जमिनी आणि मुलेबाळे त्यांच्यापासून हिरावून न्यायला सुरुवात केली, ती आजतागायत सुरू आहे. दिल्ली, केरळ सारख्या दूरच्या राज्यांपासून आजूबाजूच्या प्रदेशांपर्यंत या समाजातील 8-10 वर्षांची मुलं/मुली कामासाठी नेले गेले. काही मालक थोडे दयाळू होते तर काही अमानवीय व्यवहार करणारे ही होते. काही मृत्युमुखी पडले तर काही कामासाठी निरुपयोगी झाल्यावर सोडून दिले गेले. असुरक्षित, अशिक्षित, असंघटित नेतृत्व विहीन समाज सहन करत राहिला.जमीनदार म्हणविणाऱ्या आपल्या या अशिक्षित बांधवांच्या जमिनी एकतर कवडीमोल भावाने विकत घेतल्या गेल्या किंवा काही ठिकाणी आतंक निर्माण करून त्यांना विस्थापित केलं गेलं.1996 साली बोडोलँड मधील एका सदानी भाषी खेड्याची जमीन हडपाण्यासाठी त्या खेड्याजवळ पहाटेच्या वेळी 5-6 वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचे मृतदेह फेकले गेले. सकाळी बोडो महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याचा आरोप स्थानिक सदानी समाजावर लावला गेला. भडकलेल्या जमावाने 7000 सदानी लोकांची हत्या केली आणि जवळपास 4000 लोकांना जखमी केलं. उरलेले सदानी लोक ते गांव व आसपासची गावं सोडून पळालेत. पुढे चौकशीत सत्य बाहेर आले पण उपयोग नव्हता. दुष्ट हेतू साध्य झाला होता. दोनच वर्षांपूर्वी अप्पर आसामातील विश्वनाथ चाराली टाऊन जवळील खेड्यात ही पहाटे 3-4 वाजता अंधाधुंद गोळीबार करून 80 लोकांना मारल्याची घटना घडलीय. त्यावेळीही घरे जमिनी सोडून शरणार्थी शिबिरात गेलेल्यांची संख्या 30,000 च्या घरात असल्याची बातमी होती.

हा समाज नॉर्थ ईस्ट मध्ये भारतप्रेमी, राष्ट्रवादी शक्तींसाठी मोठा आधारस्तंभ होऊ शकतो. मात्र त्यासाठी त्या समाजात सशक्त नेतृत्व उभे करावे लागेल, त्यांच्यात "संस्कारित व सु-शिक्षित" नेतृत्व तयार करून त्यांचे भविष्य घडवू दिल्यास हा प्रचंड संख्येतील समाज बांग्लादेशी समस्येचं समाधान बनू शकतो.

जर का आमच्या उपेक्षेनी हा समाज धर्मांतरित होऊन दुरावला तर अजून एक खूप मोठी डोकेदुखी होऊन बसेल. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम वा ख्रिश्चन समाजाचे निमंत्रण स्वीकारले असते तर आज महाराष्ट्राची काय स्थिती झाली असती? अशी स्थिती सीमेजवळील राज्यात होणे धोक्याचे आहे.आपल्याच बांधवांची ही उपेक्षा आत्मघाती ठरू शकेल.

याच गोष्टी लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषदेसारख्या काही संस्थांनी तिथे आपलं काम सुरू केले आहे. तिथे एकल विद्यालयांची व्यवस्था काही प्रमाणात का होईना पण उभी रहातेय. सकाळची शाळा संपली कि 3 नंतर हे विद्यालय सुरू होते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट