#ValentineDay #प्रेमप्रकरणं



#ValentineDay #प्रेमप्रकरणं

चौथी पाचवीचं वय होतं. नऊ दहा वर्षांचं.! आमच्या गावात लहान मुलांची व्यायामशाळा होती. तिथे रोप मलखांब, जिम्न्यास्टिक्स, योगासनं शिकायला जायचो आम्ही. कधीकधी भल्या पहाटे श्रमदान करायला जायचो सगळे. तसेच एकदा जमलो होतो. व्यायामशाळेच्या दादाने कामं वाटून दिली, आणि आम्ही कचरा वेचायला, गवत साफ करायला लागलो. अंगावर थंडीची शिरशिरी येत होती. पण एका क्षणी हळूच गरम ऊब पाठीला जाणवली. मी वळून वर पाहिलं. आणि तो दिसला. वेड लावेल असा हँडसम.! माझं पहिलं वहिलं प्रेम, सूरज नाव त्याचं!

मग आठवीनववीच्या वयात मुद्दाम बँग्स् शाळेतच ठेवून आम्ही मैत्रिणी पावसात भिजत घरी जायचो. तेव्हा वरूणची गाठ पडली. वेड्यासारखा धावत यायचा माझ्यासाठी. त्याच्या प्रेम वर्षावात चिंब भिजायला मला आजही तितकंच आवडतं.

दहावीची परिक्षा संपल्यावर सगळ्या वर्गमैत्रिणी बीचवर गेलो होतो. तिथे भेटला सागर.! त्याच्याकडे एकटक बघताना त्याच्या नजरेत कधी विरघळला जीव, ते समजलच नाही.!

भानावर आले ती ओढणीला बसणार्या हिसक्याने! पवन नावाचा खट्याळ तरणाबांड गडी खोडी काढत होता. त्याच्याबरोबर डांन्स करताना देहभान हरपून जाऊ लागलं. पुढे कितीतरी वर्षं आमचं प्रकरण चाललं.!

अजून मोठी होत गेले तसतशा जाणिवा गहिर्या होत गेल्या. एकदा अशीच ट्रेकिंगला म्हणून गेले आणि आकाशला ह्रदय देवून बसले. माझ्या सगळ्या आकांक्षा, स्वप्नं पुरी करणारा विशालह्रदयी आकाश! निळा, काळा, केशरी, लालपिवळा कोणताही पोशाख घातला तरी तितकाच राजबिंडा दिसतो.

आणि माझ्या प्रेमालापांना, विरागिणींना समजून घेणारा, माझा आधार बनणारा माझा सखा शशी..! त्याची तर किती रुपं! पण मला सर्वात भावतं ते त्याचं संपूर्ण, तेजस्वी तरीही शांत स्वरूप..!

असाच अजून एक, या सर्वांना व्यापूनही शिल्लक रहाणारा, क्रुष्ण! लहानपणी बाबांच्या गोष्टींतून, आणि मग नंतर कितीतरी पुस्तकांतून कृष्ण भेटत गेला. देव, भगवान असा कधी वाटलाच नाही तो.! तोही भेटत राहितो, सतत, कुठे ना कुठे.. त्याचं असं भेटणं खूप आश्वासक, शाश्वत वाटत रहातं. अस्तित्वाच्या नाशाची जशी भिती वाटते ना, तशी आपल्या असण्याची, आपल्या अस्तित्वाचीही भिती वाटते मनाला. अशा सैरभैर जिवाला ‘कृष्णं शरणं’ सारखं सूख नाही हो।

तर प्रेम असं रोजच्या रोज असोशीनं जगणाऱ्या माझ्यासारख्या बेधुंद जीवांना valentine day चं काय कौतुक असणार!? ते बेगडी, जोडाजोड करत जगणाऱ्यांनी करावं! (I don't intend to hurt anyone's feelings.)

तरीही 11.45 वाजता सकाळची सगळी कामं उरकून नवरा जेव्हा Happy Valentine's day Sweetheart असा मेसेज करतो तेव्हा आत कुठेतरी धडधडतं.मन संध्याकाळ कधी होते, याची वाट बघायला लागतं. रात्रीच्या जेवणात काही तरी चविष्ट बेत करावा(व्हेज) असा विचार येतो. काय बनवू? काही तरी सोप्पं सुचवा.. 😉

#अमिता

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट