ईशान्य भारत आणि अलंगाववादाची आव्हाने.!



ईशान्य भारत आणि अलंगाववादाची आव्हाने.!

त्याचं आजमितीचं वय असेल अंदाजे ४०च्या आसपास. हा पूर्वांचलातील सीमेलगतच्या एका गावातला दारुडा. दारू पिऊन नेतागिरी करत हिंडणे हा त्याचा १४-१५ वर्षांपूर्वीचा दिनक्रम. तुकतुकीत पण हडकलेला ईशान्य भारतीय चेहरा.मध्यम उंची. शिडशिडीत कडक बांधा. नजर भिरभिरती, अस्वस्थ. पण डोळ्यात बुद्धीची चमक. मला माझ्या तिथल्या एका प्रवासात हा पूर्वांचलातील मूलनिवासींच्या एका प्रार्थानागृहात भेटला. स्वधर्म प्रसारासाठी आणि सत्संगासाठी म्हणून गावोगावी फिरणाऱ्या monks च्या एका ग्रुप बरोबर तोही भटकत होता. तिथे तो भाषण करायला आला होता. हि त्याने सांगितलेली त्याची गोष्ट ..

अंदाजे १४ - १५ वर्षांपूर्वी त्याला एका आतंकवादी गटाने त्याच्या गावातून उचलून, पळवून नेले. मग त्याचे training सुरु झाले. आधी छोटी छोटी कामे करीत असे. मग चांगले काम मिळू लागले. त्या गटाच्या 'आर्म्स अँड इमिग्रेशन विंग' मध्ये त्याला चांगली रँक मिळाली. त्या अंतर्गत तो बर्मा,साऊथ चीनलाही जाऊन आला. शस्त्रास्त्रांची तस्करी करणे हे त्याचे मुख्य काम. काही वर्षांनी हे काम करत असताना त्याला अटक केले गेले. १ वर्षाची सजा भोगून तो गावी परतला. तिथे दुसऱ्या आतंकवादी गटाच्या प्रमुखाचा संदेश आला. त्याने त्वरित तो ग्रुप जॉईन केले. तिथेही सगळे पहिलेच उद्योग सुरु झाले. 'भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण व्हावी' म्हणून हे सगळे उद्योग करतोय,क्रांती घडवतोय अशी बतावणी त्याला तिथे करण्यात येत असे. कारण भ्रष्टाचारमुक्त सरकार हे 'त्याचे' स्वप्न होते. या प्रमुखाबरोबर त्याच्या बैठका होत. त्याने याला जबरदस्तीने ख्रिश्चन बनवले. इकडे हा आतंकवादी नेता त्यांना शिकवायचा कि नागालँड, अरुणाचल आणि अर्धे मणिपूर आपण भारतापासून तोडू आणि चीन मध्ये सामील होऊ. चीन या सगळ्या गोधळात कश्या प्रकारे खेळी खेळतो हे त्याने स्वतः अनुभवलंय.नंतर त्याला परत अटक झाली. २ वर्षांनी सोडून दिले गेले. या सगळ्या काळात त्याने ख्रिश्चानिटीचा काळा, राक्षसी चेहरा पहिला आहे. पाद्री, फादर, चर्चेस ही आतंकवादाची, अमेरिका आणि इतर परदेशी शक्तींसाठी मुक्त द्वारे आहेत,असे तो स्पष्ट म्हणतो. ख्रिश्चानिटीचा, आतंकवादाचा बुरखाफाड करतो. भाषेच्या अडचणीमुळे मला काही मुद्दे कळले नाहीत. पण कमी अधिक प्रमाणात या फुटीरतावादी गटांमध्ये सामील होणाऱ्या तरुणांची कहाणी, अवस्था, मानसिकता ही अशीच असते.

फुटीरतावादाची सुरुवात आणि इतिहास:-

ईशान्य भारतात या अलगाववादाची सुरुवात १०० वर्षांपूर्वीच झाली आहे. इंग्रजांनी आपला गाशा गुंडाळताना जगभरात कितीतरी गोंधळ घालून ठेवले आहेत. ठिकठिकाणच्या संस्कृती, लोक, समाजव्यवस्था याचे तुकडे पाडले. तिथला एकसंधपणा नष्ट केला. तिथल्या संस्कृती लयाला गेल्या. ईशान्य भारतही अश्याच चालींचा बळी आहे. इथे फुटीरतावाद अनेक रूपात आपल्या समोर उभा आहे. विविध दुष्ट शक्ती यात सामील आहेत. आपल्या मागण्या मान्य केल्या जाव्यात, आपले न्याय्य हक्क आपल्याला मिळावेत, यासाठी समाज अनेक प्रकारची आंदोलने करतो. परंतु शस्त्रक्रांती हा सगळ्यात शेवटचा टप्पा असतो. इथे क्रांतीची सुरुवात शस्त्रानेच झाली असे आपल्याला लक्षात येते.

या राज्यांचा इतिहास समजुन घेताना या गुंतागुंतीची थोडी उकल होऊ लागते. इंग्रजांचे प्रमुख उद्दिष्ट अधिकाधिक संपत्ती निर्माण करणे, नैसर्गिक संसाधनांचे शोषण करणे असे होते. त्यांना इथल्या लोकांबद्दल कसलीही आपुलकी नव्हती. आसाममधल्या शेतमळ्यांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी म्हणून इंग्रजांनी प्रामुख्याने पूर्णचलच्या बाकीच्या भागांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. इथल्या लोकांना अंशतः स्वायत्तता देऊन आपले या भागावरचे अधिकार त्यांनी सुरक्षित केले. त्याआधी इथे वेगवेगळी राज्ये आणि समाजव्यवस्था होती. आहोम राज्यकर्ते आसाम मध्ये १९३० पर्यंत होते. मग तिथे इंग्रजांचे अधिकार आले. मणिपूरमध्ये मैती नावाचे राजे होते. सिक्कीम मध्ये नागमेय राजे होते. हे स्वतंत्र भारतात १९७५ साली सामील झाले. त्रिपुरा मध्ये मणिका राजे होते. तर अरुणाचल, मिझोराम आणि नागालँड मध्ये गावागावात प्रमुखाची भूमिका खूप महत्वाची असे. त्यांनाच राजाचा मान मिळत असे. १९४७ साली केवळ आसाम हेच एक मोठे राज्य भारतात होते. आणि नेफा म्हणजे अरुणाचल प्रदेश हि एक युनियन टेरिटोरी होती. नंतर वेगवेगळ्या काळात त्यातून हि छोटीछोटी राज्ये बनली. त्यासाठी निरनिराळे accords किंवा करार केले गेले. सगळ्या प्रकारात ज्यांच्या मागण्या पूर्ण झाली नाहीत किंवा त्यांना अपेक्षित असणारा फायदा ज्यांना मिळाला नाही त्यांनी फुटीरतावादी आंदोलने उभी केली. याकामी त्यांना चीन, बांगलादेश, चर्च, म्यानमार इत्यादी शक्तींनी सर्व प्रकारची मदत पुरवली.

या सातही राज्यांत, अनेक जिल्ह्यांमध्ये १००हूनही अधिक विद्रोही गट कमीअधिक प्रमाणात सक्रिय आहेत. आणि त्यांच्या मागण्याही विविध स्तरांवरच्या आहेत. यातले NSCN(I, M)(K ), ULFA (उल्फा), बोडो, कुकीलँड, हिल नॅशनल लिब्रेशन कौन्सिल, NLFT, KLNLF, इत्यादी अतिरेकी गट खूप चर्चेत असतात. त्यांच्या मागण्या, त्यांचा लढा वरकरणी तरी त्यांची ओळख आणि जाती, धर्म आणि इतिहास यांच्या अस्मितेसाठी आहे. परंतु, या दाव्यांची सत्यता आणि ख्रिस्ती मिशनरीजची या सगळ्या प्रकारणांमधली भूमिका ही या सगळ्या विषयातली महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यात आधीच्या सर्व सरकारांच्या दुर्लक्ष करण्याच्या, उदासीन, नकारात्मक वृत्तीमुळे या गटांना चांगलेच रान मोकळे मिळाले. या विद्रोही गटांमध्येही काळाच्या ओघात बऱ्याच वेळा फूट पडली. भारतीय सरकार त्यांचा शत्रू आहेच, परंतु त्यांची एकमेकांबरोबरही छोटीछोटी युद्धे होत असतात.

लिपीवरून संघर्ष:-

इथे लिपी कोणती असावी याबाबतही लोकांना संघर्ष करावा लागला आहे. बोडो भाषा कोणत्या लिपीत लिहिली जावी हा वादाचा मुद्दा होता. बोडो साहित्य सभेने देवनागरी लिपीचा पर्याय निवडला. परंतु चर्चने बोडो भाषेसाठी रोमन लिपीचा वापर व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. जेव्हा बोडो साहित्यसभेने या विरोधाचा विरोध केला तेव्हा ख्रिश्चन बोडो उग्रवादी संघटनेने 19 ऑगस्ट 2000 रोजी साहित्य संघाचे 'अध्यक्ष बिनेंश्वर ब्रह्मा' यांची हत्या केली. अजून उदाहरण द्यायचे झाल्यास, मेघालयातील 'गारो हिल्सचे हजोंग लोक' बंगाली व आसामी प्रमाणेच बोली बोलतात. आणि लिहिण्यासाठी बांगला स्क्रिप्टचा वापर करतात. परंतु हजोंग भाषा, रोमन लिपीमध्ये बदलण्यासाठी, चर्च प्रायोजित हजोंग युवकांनी दबाव आणण्यास सुरुवात केली. जेव्हा हाजोंग भाषा परिषदेने यासाठी स्पष्ट नकार दिला, तेव्हा त्यांनी परिषदेचे अध्यक्ष अर्नाब (निखिल) हाजोंगवर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने ते या जीवघेण्या संकटातून आश्चर्यकारकपणे वाचले. ब्रिटीशांनी आसामी विरुद्ध बंगाली भाषिक वाद त्या काळात जाणीवपूर्वक निर्माण केला.

वसाहतवादी शक्ती आणि चर्चद्वारे अलगाववादाची लागवड:-

ब्रिटिश अधिपत्यामुळे नागा समाजजीवनात अनेक बदल झाले. शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे राजकीय जागरूकता वाढली. इंग्रजीचा परिचय झाल्यामुळे विविध जमातींना एक समान भाषा तयार करता आली. इंग्रज शासन काळात, डोंगराळ जिल्ह्यातील प्रशासक म्हणून काम करण्यास कोणाही भारतीयाला परवानगी दिली गेली नाही. ख्रिश्चन धर्मप्रसारकही ब्रिटिषांच्या पावलावर पाऊल टाकून कामाला लागले. यात अमेरिकेच्या बॅप्टिस्टांनी पुढाकार घेतला. धर्मांतरांचा वेग वाढवण्यासाठी त्यांना परदेशातून भरपूर मदत मिळू लागली. ख्रिस्ती धर्मांतरे आणि साक्षरतेमधील जलद वाढीमुळे, नव्याने एका छत्रीखाली आलेल्या नागासमाजाची एकता वाढू लागली. पण

त्याचबरोबर भारत आणि भारतीय यांच्याविषयी तिरस्कार त्यांच्या मनात पद्धतशीरपणे रुजवला गेला. सशस्त्र बंडाच्या मदतीसाठी रेड क्रॉस बॉक्समध्ये शस्त्र आणि दारुगोळा पुरविणार्या 'रेव. मायकेल स्कॉटसारख्या' मिशनऱ्यांच्या प्रभावामुळेच (NNC) 'नागा नॅशनल कौन्सिलचा' प्रमुख 'अंगामी झापू फिझो' यांनी आपला स्वायत्ततेचा अजेंडा बदलून सार्वभौमत्वासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग शोधला. हिंसा आणि ख्रिश्चानिटी एकमेकांना पूरक ठरू लागले. एकमेकांच्या साथीने वाढू लागले.

नागा विद्रोहाचा अभ्यास करताना असे लक्षात येते, कि या इतिहासात अनेक आंतरप्रवाह आहेत. नागालँड फॉर ख्रिस्त किंवा NSCN सारखे विविध छोटेमोठे गट तयार होण्यामागे बराच होमवर्क केला गेला आहे. बारीक सारीक जातीजमातींना चुचकारत बसण्यापेक्षा एकाच मोठ्या गटाला आपल्या काबूत ठेवणे अधिक सोपे आहे हे वसाहतवादी इंग्रजांच्या आणि त्यांचे धर्मबंधू ख्रिस्ती मिशनरीज यांच्या लक्षात येऊ लागले. अस्तित्वात नसलेल्या जमाती अस्तित्वात आणून अनेक छोट्यामोठ्या जमातींना ती ओळख स्वतःची म्हणून लावण्यास भाग पाडले गेले. जेणेकरून सर्व जमातींवर एकछत्री अंमल प्रस्थापित करता येईल; आणि ते लोक स्वतःच्या आयडेंटिटीसाठी विद्रोह करणार नाहीत. पूर्वोत्तर भारतात नागा अशी जमात नव्हती. गावाचे नाव हीच त्या जनजातीची ओळख असे. पूर्वी 'नागा हिल्स आणि तुंएनग्सांग' नावाचे एक प्रशासकीय युनियन होते.जर सगळे एकच नागाच होते तर 'नागा हिल्स आणि तुंएनग्सांग' अशी दोन नावे लावण्याचे कारणच काय? याचाच अर्थ असा की, तुएनसांग मधील सर्व प्रमुख जमाती गैर- नागाज होते. परंतु चर्च आणि एनएससीएन बंडखोरांनी त्यांना नागा ओळख स्वीकारण्यास भाग पाडले.असे अनेक पुरावे आता समोर येऊ लागले आहेत. अरुणाचलच्या चांगलांग, लॉंगडिंग आणि तिराप जिल्ह्यातही अशीच कथा आहे. तिथेही स्थानिक जमातींना त्यांच्या जमाती नागा म्हणून उल्लेख करण्यास भाग पाडले जाते. केवळ ग्रेटर नागालॅंडचे(स्वतंत्र देश) स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सगळा खेळ मांडला जात आहे.

पूर्वांचल आपल्यासाठी धोरणात्मक आणि भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा भूभाग आहे. इतकेच नाही तर या ४.५ कोटीहून अधिक लोकांच्या स्वास्थ्य, सुरक्षिततेची जबाबदारीही भारताचे नागरिक म्हणून भारत सरकारची आहे.

दोन किंवा अधिक वेगवेगळ्या राज्यांची सरकारे, केंद्र व राज्य सरकार, आणि केंद्र सरकार व विविध देशांची सरकारे असे तीन प्रकारचे आणि अनेक गुंतागुंतीचे संबंध यात अडकलेले आहेत. या सर्वाना एका प्लॅटफॉर्म वर आणून सर्वांना न्याय्य, व्यवहार्य आणि सुकर होईल असे मार्ग यातुन काढणे अतिशय जिकिरीचे काम आहे.

अमिता आपटे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट