#Metoo
#Metoo
#Metoo हे अमेरिकेतून आलेलं वारं. भारतात या ह्ॅषट्ॅगने चांगलच मूळ धरले आहे. ही चळवळ सुरू झाली, तेव्हा माझ्या मित्राने याबाबतचे माझे मत विचारले होते. माझे वैयक्तिक मत गाॅसिप म्हणता येईल अशा विषयांत लक्ष न देणे, त्याऐवजी विधायक गोष्टी करणे असे आहे, असे मी त्याला सांगितले. माझे आजही तसेच मत आहे. परंतु हा विषय चावडीवर फिरून फिरून येत रहातो, म्हणून मग विचार करून काही लिहावे वाटले.
एक महत्त्वाची गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे की, Metoo चळवळीमुळे अनेक स्त्रिया आज हिंमत बांधून, आपल्यावर भूतकाळात झालेला अन्याय, आपला लैंगिक शोषणामुळे झालेला अपमान, विविध माध्यमांतून समाजासमोर मांडत आहेत. आपल्या वर्षानुवर्षे खदखदत असणाऱ्या संतापाला वाट करून देत आहेत. संबंधित शोषणकर्त्याचे खरे किंवा दुसरे रूप जगासमोर उघडे करत आहेत. बाकी महिलांना सावध रहायला सुचवत आहेत. त्यांचा सन्माननीयतेच्या बुरख्याआडचा असंस्कृत, पाशवी चेहरा लोकांना दाखवत आहेत.
लैंगिक अत्याचाराची विविध परिमाणे व प्रकार आहेत. शाब्दिक स्वरूपाची छेडछाड ते पाशवी बलात्कार यातील सर्व शेड्स यात समाविष्ट करता येतात. जितक्या व्यक्ती, तितक्या प्रक्रुति असा प्रकार आहे.
या सगळ्याला सामोरे जाताना सामान्य माणसाच्या मनात, या स्त्रिया अशा लैंगिक अत्याचारांचा त्याच वेळी बभ्रा का करत नाहीत? त्या विरोधात आवाज इतक्या वर्षांत का उठवला नाही?
आता ओरड करून काय मिळणार आहे? खरतर यांना यातून नक्की काय मिळवायचे आहे? असे अनेक प्रश्न येतात. आणि ते स्वाभाविकच आहे.
कारण या प्रकारात शोषित आणि आरोपी यांच्या अशा कहाण्या मोठ्या प्रमाणावर हायलाईट झाल्या ज्यांमुळे आधी गप्प बसून आणि आता ओरड करून वैयक्तिक विविध प्रकारचे लाभ मिळतात असे प्रथमदर्शनी तरी नजरेस येते आहे.
आता काही मुख्य प्रकारच्या केसेस पाहू.
१. एखादी व्यावसायिक, नोकरदार किंवा घरगुती स्त्री अशा अत्याचाराची बळी आहे. समोरच्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, स्थान, आवाज उठवल्यामुळे होणारे त्या स्त्रीचे नुकसान (उत्पन्नाचे साधन गमावण्यापासून ते चारित्र्य हनन, सामाजिक, कौटुंबिक स्थानी अवहेलना) या गोष्टींना घाबरून ती महिला केवळ सहन करत रहाते, परिस्थितीशी जमवून घेते किंवा शोषकाशी संपर्क येणार नाही अशी व्यवस्था करते. काही यशस्वीपणे प्रतिकारही करतात. (पण म्हणून त्यांनी MeToo चळवळीत सहभागी होऊ नये असे नाही.) या चळवळीतल्या बहुतांश महिला या प्रकारात मोडतात असे म्हणता येईल. कारण आता वय, सामाजिक स्थान इ. बाबतीत त्यांचीही प्रगती झाली आहे. गमावण्यासारखे आता काही राहिले नाही. बदल्याची भावना, न्यायाची अपेक्षा मात्र आजही प्रबळ आहे. अशा परिस्थितीत ही चळवळ मोठा आधार वाटली तर चूक काय?
२. दुसरा वेगळा प्रकार असा आहे की भूतकाळात जे झालं किंवा actually झालंही नाही, त्याबाबत आज ओरड करून आर्थिक, राजकीय, सामाजिक असे विविध प्रकारचे लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गोष्टीचा परिपूर्ण फायदा घेण्याचे प्रकारही या चळवळीच्या माध्यमातून केले जात आहेत असे आपल्याला वाटत रहाते. ज्या स्त्रीने आरोप केलेत आणि ज्या पुरुषावर आरोप झाले आहेत त्यांची आपल्या मनातली प्रतिमा जशी असेल त्याप्रमाणे हे perception बदलत जाते. त्यामुळे एकाच केसबाबत, दोन otherwise संयमित, स्थीर भुमिका घेणाऱ्या लोकांची मते अगदी विरुद्ध टोकाची असू शकतात.
कोण खरे, कोण खोटे, योग्य- अयोग्य, काय न्याय्य, काय अन्याय्य हे संविधानिक पद्धतीने ठरवायचे कोणतेही मापदंड सध्यातरी अशा केसेस च्या बाबतीत आपल्या द्रुष्टीपथात येत नाहीत. एकतर ही लाट आहे. स्वार्थ साधून झाले की विरून जाईल. किंवा हा एक प्रवाह तयार झालाय. स्त्रीला योग्य तो सन्मान देण्याच्या युद्धात याचे योग्य ते दान पडेलच.
आपण सद्यस्थितीत MeToo च्या प्रवाहात उडी घेतलेल्या स्त्रिला नावे ठेवणे योग्य ठरणार नाही, तसंच ज्या व्यक्तीवर आरोप झाले आहेत त्या व्यक्तींना outrightly reject करणे, दुषणे देणेही अयोग्य ठरेल. ज्याच्यावरचे आरोप कोर्टात सिद्ध झाले आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण आपण एखाद्या व्यक्तीच्या opportunistic असण्याबाबत किंवा characterless असण्याबाबत वैयक्तिक पातळीवर कितीही convinced असलो तरीही सोशल मीडियावर या गोष्टींवर भाष्य करताना unbiased आणि संयमित अशीच भुमिका आपण घेतली पाहिजे.
येत्या काळात या situations वर तोडगे, उत्तरे मिळतील अशी आशा करुया. मानवी समाजाला अधिकाधिक सुसंस्कृत बनवण्यासाठी योगदान देऊयात.
एक ज्योक - 😁
दहशत :
आज सकाळी उठलो तर समोरच्या वाहिनी आमच्या दारापाशी उभ्या राहून MeToo MeToo जोरात ओरडत होत्या. मी एकदम घाबरलो, घामाघूम झालो तरी चादर अंगावर घेऊन पडून राहिलो...
थोडा वेळाने आवाज बंद झाल्यावर अंदाज घेतला तर समजले की त्यांचा पोपट उडून आमच्या दारावर येऊन बसला होता आणि त्या प्रेमाने (?) मिठू मिठू करून त्याला बोलावत होत्या...
याला म्हणतात दहशत. 😓😓
😋
#अमिता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा