उंडगी


नमस्कार. मी अमिता आपटे. एका सामान्य घरातली सामान्य गृहिणी, आई! मी गेली २-३ वर्षे ईशान्य भारतात जाते. वर्षातून २-३ फेऱ्या सहज होतात. आपण, म्हणजे मी, संघटनेतर्फे तिथे काही उपक्रम हाती घेतले आहेत. मला एकूणच या कामाची प्रेरणा कशी मिळाली आणि माझा तिथला अनुभव याविषयी काही माहिती रानडे काकांनी शब्दबद्ध करायला सांगितल्यामुळे हा लेखप्रपंच.!

मी कॉलेजला असताना, ईशान्य भारतातील काही मुली जनकल्याण समितीच्या माध्यमातून शिक्षणासाठी म्हणून आमच्या गावात आल्या. मग त्यांची सगळी व्यवस्था, शाळा, खाणेपिणे, खेळ, कपडे, अभ्यास यासाठी महिला कार्यकर्त्यांची गरज असल्यामुळे आम्ही काही मैत्रिणी, काही मोठ्या महिला तिथे नियमितपणे जाऊ लागलो. ईशान्य भारताशी पहिली ओळख झाली ती अशी.! मग पुढच्या दोन वर्षांत ईशान्य भारतातील अडचणी, आयुष्य पध्दती, तिथल्या समाजाची जडणघडण याचीही थोडी ओळख होऊ लागली. गंमत सांगायची म्हणजे, माझे लग्न हे या हॉस्टेलमधील मुलींनी अनुभवलेले पहिले हिंदू, किंवा मराठी लग्न होते. लग्नानंतर मात्र या कामाशी संपर्क तुटला.

माझ्या भागात मी वनवासी कल्याण आश्रमाचे काम करतेच. पण ईशान्य भारतात जावे, काही काम करावे, ही सुप्त, जुनी इच्छा काही जिरली नव्हती. आणि ती संधी एक दिवस आली. माझ्या नवऱ्याचे मित्र श्री. सुशील सायकर हे दरवषीप्रमाणे सायन्सचे छोटेछोटे प्रोजेक्ट्स घेऊन अरुणाचल प्रदेश येथे जाणार आहेत असे आम्हाला कळले. मग मीही जाण्याची तयारी केली. या १० दिवसांत आम्ही विविध शाळांमध्ये फिरलो. शास्त्रातील गमतीदार प्रयोगांची मुलांना ओळख करून दिली. त्यांच्याकडून काही प्रयोग करून घेतले. या काळात तिथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी ओळखी झाल्या.

घरी आले, पण मनात म्हणावं तसं समाधान नव्हतं. आपलं काम पुरं झालं नाहीये; आणि अजून एकदा तरी परत जाऊन यायला पाहिजे असं मनात येत होतं. मग क्काय! संघटनेशी संपर्क केला. सोयीस्कर अश्या वेळा ठरवल्या आणि गेले परत.! यावेळी घरोघरी जाऊन काही माहिती जमावण्याचं काम मला मिळालं होता. आणि मग ती माहिती संकलित करून रिपोर्ट बनवून संघटनेला द्यायचा होता. हे काम अगदी मनाजोगतं पुरं झालं; आणि मला अजूनच हुरूप आला.

परत येण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले होते. त्याप्रमाणे ४-५ महिन्यांतच पुढचा प्रवास ठरला. मी प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशात काम करत असल्यामुळे इथल्या स्थानिक आणि पदाधिकारी वर्गाशीही आतापर्यंत ओळख, मैत्री झाली होती. इथे पूर्णवेळ स्त्री-पुरुष प्रचारकांना full timers असं म्हटलं जातं. या महिला कार्यकर्त्या तर माझ्याच वयाच्या पुढे मागे असणाऱ्या मुली आहेत. त्यामुळे औपचारिकता, नवखेपणा संपून मोकळेपणा कधी आला, ते आम्हा कोणालाच समजलं नाही.

पोळी हे काही तिथलं नियमित अन्न(स्टेपल फूड) नाही. पण 'मुंबई कि दीदी' म्हणून जिथे जाते, तिथे काही ना काही विशेष मुद्दामून बनवलेला पदार्थ खायला मिळतो. स्थानिकांचे प्रेम, त्यांचा उत्साह पाहून मलाच कितीदातरी अवघडून जायला होतं. अतिशय प्रेमळ, पटकन विश्वास टाकणारा, अगत्याने अगत्य करणारा असा हा समाज आहे.

हा जो नवा प्रकल्प माझ्या हाती दिला गेला होता, त्यात मला विविध जमातीतील लोकांच्या लग्न, बारसे, सणसमारंभ इत्यादी चालीरीतींचे documentation आणि व्हिडिओ शूटिंग करवून घ्यायचे होते. यासाठी लागणारा खर्च संघटनेकडून मिळणार होता. पण विविध ठिकाणी फिरून अभ्यासू आणि कलाकार लोकांना हा विषय समजावून देऊन, त्यांना हे काम करण्यासाठी उदयुक्त करणे, ती कामे लवकरात लवकर त्या त्या लोकांकडून पुरी करून घेणे, असं काम मला प्रामुख्याने करायचं होतं. एकंदरीत सुरुवातीला तरी मला तरी हा उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा प्रकार वाटत होता. पण संघटनेला जबाबदारी घेऊन काम पुढे सरकवणारी, glamorous वाटेल अशी व्यक्ती या कामासाठी हवी होती. मग मीही उत्साहाने हे काम हाती घेतलं. आज ५ जमातींसाठीची आपली शुटिंग्स आणि लिखित माहिती स्वरूपातील पुस्तिका तयार झाल्या आहेत. कामात अडथळे तर खूपच आले. वेळखाऊ आणि कंटाळवाणे वाटू शकेल असे हे काम माझ्या कार्यकर्ते मित्रवर्यांच्या सहकार्यानेच मी अगदी समाधानपूर्वक पुरे करू शकते आहे. आता हेच काम अजून काही जमातींसाठी करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. पुढच्या वेळी जाईन तेव्हा ते सुरु करेन.

याच्या पुढचे काम तर खूपच उत्साहवर्धक आणि माझ्या आवडीचे होते. अरुणाचतील सन्माननीय, आणि आपल्या क्षेत्रात काही विशेष कामगिरी केलेल्या यशस्वी स्रियांच्या मुलाखती घेण्याचे काम मला मिळाले. अठरा दिवसांचा हा प्रवास म्हणजे माझ्यासाठी अमूल्य आठवणींचा ठेवा आहेत. या सगळ्याच स्त्रिया आपण विचारही केला नसेल अश्या अनंत अडचणीतून मार्ग काढत आयुष्याच्या लढाईत सफल झाल्या आहेत. स्त्रीशक्तीचं हे एकेक रूप जवळून अनुभवताना थक्क व्हायला होत होतं. या यशस्वी महिलांत कोणी अनाथांची माय आहे तर कोण आपल्या राज्यातल्या पोराबाळांना ड्रग्ज च्या विळख्यातून सोडवण्यासाठी अहोरात्र, वर्षानुवर्षं झटते आहे. कोणी एव्हरेस्ट सर करून आली आहे, तर कोणी शिक्षणाचा पाया रचते आहे. कोणाकडे जनजातीच्या सर्वोच्च अध्यात्मिक गुरुचं स्थान आहे, तर कोणी पहिली IAS असा किताब धारण करून आहे. कोणी पद्मश्री प्राप्त अधिकारी तर कोणी सामान्य ग्रुहिणी असुनही असामान्य कर्तबगार! आदिशक्ती, स्त्रीशक्तीचं वारंवार प्रत्यंतर येतं होतं. याच मुलाखती आता गोष्टीरूपात पुस्तकातून वाचकांच्या भेटीला येऊ घातल्या आहेत.

या सगळ्या माझ्या नसत्या उठाठेवींमध्ये माझ्या घरच्यांचीही मोलाची साथ मला लाभली आहे. नवरा किंवा सासूसासरे कोणीही मला कधी जाऊ नकोस, असे आजतागायत म्हटलेले नाही. माझ्यामागे मुलाचे शाळा, अभ्यास, खाणेपिणे, नेणे-आणणे सासूबाई आणि सासरे अगदी प्रेमाने करतात. माझे लेख वाचणे किंवा लिहून झाल्या-झाल्या ऐकणे या दोन नावडत्या गोष्टी सोडल्या तर त्यांनाही माझ्या या कामाचे(उंडगेपणाचेच म्हणा ना!) कौतुकच आहे. एकत्र किंवा संपूर्ण कुटुंब हि एक संपत्ती आहे, आणि ती सगळ्यांनी मिळून निगुतीने सांभाळली पाहिजे असं मला अनेकदा वाटतं.

या सगळ्या अडीच तीन वर्षांत मला काय मिळाले असा लेखाजोखा मांडला, तर मोजता येणार नाही इतक्या आणि मांडता येणार नाहीत अश्या अनेको गोष्टी मी मिळवल्या. लाखो रुपये खर्चून जगाची वारी करूनही मिळणार नाहीत असे अनुभव मिळाले. मोठ्या मनाची माणसे म्हणजे काय, याचा प्रत्यय तर घटकेघटकेला आला. भारताचं एक वेगळच दर्शन इथे आल्यावर होतं. माणूस म्हणून मी हे नक्की म्हणू शकते, कि ३ वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी या दोनही वेगवेगळ्या स्त्रिया आहेत; इतका बदल माझ्यामध्ये झाला आहे. विविध धर्मांचा, त्यातील तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी मिळाली. सामाजिक भान उन्नत झालं. आणि कामाचं समाधान? ते असं मोजता येतं काय?

ईशान्य भारतात सामाजिक जाणिवेतून काम करायला खूप वाव आहे. आपल्या सगळ्या गुण दोषांसहित आपण आपल्याला पचेल, रुचेल, जमेल असे काम हातात घेऊन ते तडीस नेऊ शकतो. अगदी विविध विषय शिकवणे, महिला शिक्षण, बचत गट, छोटे मोठे अनेक विषयांतील प्रकल्प अश्या शेकडो गोष्टी समोर येतील. गरज आहे निश्चय करून कामाला लागणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची..

#अमिता

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट