#Sex_Education



#Sex_Education

आज LGBT च्या case चा निकाल लागला आणि त्या निमित्ताने सगळीकडेच जोरदार चर्चा झाल्या. मुलांच्या कोवळ्या मनांवर या सगळ्या ओपन चर्चांचा काय परिणाम होतोय किंवा होईल असे concerns उपस्थित झाले. त्यावेळी मनात आलेले विचार लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न करतेय.

सेक्स हा विषयच नाही तर शब्दही आपल्या सामान्य आयुष्यात अजूनही 'टाबू' म्हणावा असाच आहे. ही एक सामान्य पण 'खाजगी, वैयक्तिक' आयुष्यातली गोष्ट आहे. आणि ती तशीच असणं समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. आता फुरफुरे -रोगामी यावरही वाद घालू शकतील. पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. भावनिक गरज असेल बिचाऱ्यांची! असे म्हणून सोडून देऊ. कोणी म्हणेल, हल्ली नसत्या गोष्टीचा उगाच बाऊ करतात. जणू काही यांच्याआधी कोणी वयात आलंच नाही.! इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि अगदी १५ वर्षांपुर्वीपर्यंतही समाजमन आज जितकं ढवळून निघतय तितकं पिसाटलेलं नव्हतं. साधं उदाहरण घेऊ. हल्ली प्रत्येक मूवी मध्ये १ तरी चुंबन दृश्य असतेच. तुमच्या आमच्या लहानपणी किती मुले इतक्या सर्रास प्रणयदृश्यांना एक्सपोज्ड होत होती? येणारी वादळे थांबवण्याची आपली ताकद नाही. परंतु यांच्या झंझावातात केवळ टिकून राहणंच नाही तर बहरून येण्यासाठी आपण आपल्या मुलांना उत्तम खतपाणी निश्चितपणे देऊ शकतो. आता आपल्या विषयाकडे वळू.

पालक म्हणून मोठं होताना नैसर्गिकपणे आपण 'लैंगिक शिक्षण कसं द्यावं', याचं शिक्षण घेत असतो. अर्थात मन आणि मेंदू जागेवर ठेवले तरच ते शक्य आहे. कोणत्याही टोकाच्या भूमिका न घेता 'निसर्गाचे चक्र' असे समजून या विषयांकडे पहिले तर कोणतीही व्यक्ती हे प्रसंग कौशल्याने हाताळू शकते. म्हणजे अगदी अडाणी, अशिक्षित बायकांकडून मी याबाबतची अतिशय समंजस, मौल्यवान मतं ऐकली आहेत.

मी चौदा एक वर्षांची असेन. एका लहानश्या गावात एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे एक Just married वैनी होती. संतापानं फणफणत kitchen मध्ये आली. घरातल्या ४ वर्षाच्या पोरावर चिडली होती. अंगाला हात लावतो,म्हणाली. तिथे एक मावशी भांडी घासायला आली होती. ती म्हणाली,'' अगं लहान पोर आहे ते. या वयात मुलं चव घेऊन, वास घेऊन, हात लावून जग जाणून घेत असतात. 'कुतूहल' या पलीकडे त्याच्या मनात काही नाही बरं..!'' तिच्या या वाक्यावर वहिनीने नाक मुरडलं आणि तो विषय तिथेच संपला. पण या दोन मिनिटांच्या कालावधीत माझं मोठं शिक्षण झालं होतं. मग माझ्या मुलाने चौथ्या वर्षी मला जेव्हा विचारलं, कि आई तू आणि बाबा वेगळे का दिसता? तेव्हा त्याला नक्की काय विचारायचं आहे, आणि स्त्री पुरुष शरीरांतला फरक त्याला कसा समजावयाचा या बाबतची माझी भूमिका स्पष्ट होती.

मुलांचे अवघड किंवा वेडेवाकडे प्रश्न हा पालकांच्या दृष्टीने कधी कौतुकाचा, कधी अडचणीचा, तर कधी लाजिरवाणा प्रकार असतो. हल्ली बरेच पालक, मुलांनी आचरट वाटतील असे प्रश्न विचारले, तरी कोणतीही तीव्र प्रतिक्रिया न देता, तो प्रसंग खुबीने हाताळायला शिकले आहेत. मुलांना घाबरवून गप्प बसवल्याने मानसिकदृष्ट्या ती आपल्यापासून दुरावतील, आपल्यापासून गोष्टी लपवून ठेवू लागतील, हि समज हल्ली बऱ्याच पालकांना आलेली दिसते. या कामी विविध पुस्तके, पेरेंटिंग साईट्सचं योगदान अमूल्य आहे.

प्रत्येक वेळी सर्व गोष्टी शास्त्रीय दृष्टीकोनातूनच सांगायला हव्यात असं काही नियम नसतो. आजच पोराने शाळेतून आल्या आल्या एका लैंगिक अवयवाविषयी slang असलेल्या शब्दाचा अर्थ विचारला. त्याला म्हटलं,'' As of now, understand that its a bad word. And we are not supposed to use it. त्यावरही बरीच उलटपालट चर्चा झाली. शेवटी त्याच्या मित्राची खालून हाक आली आणि मी सुटले.

परवा आमच्या रिनीने(कुत्री) एक कोंबडी पळवून आणली. हा नऊ वर्षांचा पोरगा येऊन मला सांगतो,''अगं आई, those chickens were mating. so they didn't see Rini. आम्ही दोघेही shocked.. आपटेबुवा म्हणाले, गोटू मोठा व्हायला लागला.'' आता डिस्कवरी चॅनेल वर कधी यातलेही काही व्हिडिओज असतात. एकदम झटक्यात बदलून न टाकता आम्ही ते एक दोन मिनिटांनी जरा खूबीनेच बदलतो. पण तितक्या वेळात माहिती मेंदूत शिरलेली आहे. आणि ती कुठे कशी वापरायची याचे शून्य ज्ञान आहे. पण शब्द किंवा मिळालेलं 'ग्यान' वापरायची खुमखुमी केव्हडी...

आमच्याकडे पिल्याची सगळी भावंडे जमली होती काही दिवसांपूर्वी. मग काय मस्ती मारामारीला उधाण आलं होतं. एक या पोरांच्याच वयाची छोटुकली तक्रार घेऊन आली, हा गाल ओढतो, तो केसांचा बो ओढतो म्हणून.! मग माझ्या जावेने त्यांना गोळा केलं. हिला मांडीत बसवलं. आणि 'कोणत्याही गर्ल्ने जर आपल्याला, 'मला एखादी गोष्ट केली तर आवडत नाही. करू नको’, असं स्पष्ट सांगितलं तर लगेच थांबायचं. आणि फक्त गर्ल नाही तर आपल्यामुळे कोणालाही त्रास होईल अस वागायचं नाही. पण कोणी आपल्याला त्रास दिला तर मात्र त्या माणसाला अज्जीबात सोडायचं नाही. चांगलं सडकून काढायचं.' असं ‘’मौलिक ज्ञान’’ दिलं. आणि त्या छोटीला म्हणाली,''आपण घाबरलो किंवा रडलो ना, कि समोरच्याला अजून चेव येतो. म्हणून न रडता आपल्याला शक्य असेल तशी fight करायची. नाहीतर लग्गेच आई बाबाला सांगायचं.'' शांत बसलेली सगळी मुलं दोन मिनिटांत परत मस्ती करायला लागली. पण तिने जे सांगितलं, ते प्रत्येकाच्या डोक्यात व्यवस्थित शिरलंय, आणि मुलं हि जाणीव नक्की जपतील, हे आम्हाला कुठेतरी पक्कं जाणवलं.

 ‘हे मला माहित हवं, किंवा 'बॅड टच' या गोष्टीही अश्याच प्रसंगानुरूप वेल इन ऍडव्हान्स सांगितल्या तर सोपं होतं. पाळीच्या संदर्भातही आजकाल बराच awareness येऊ लागला आहे. म्हणजे बाजूला बसणे, वगैरे प्रकार तर २००० च्या पुढच्या पिढ्यांमध्ये एकदम कमीच होऊन गेले. रिनीला(कुत्री) मेन्सेस सुरु झाल्यावर आमचा हिरो हळूच येऊन मला सांगत होता,''आई, तिला कुठेतरी लागलंय. ब्लड येतंय.'' मी लगेच संधीचा फायदा घेऊन, दोन तीन वाक्यात, बाळ होण्याची पूर्वतयारी म्हणून naturally females ना असं होतंच, असं सांगितल्यावर तो आपसूकच तिची जरा जास्तच काळजी घ्यायला लागला. मी भरून पावले. A pet at home is a blessing...

तर हे सगळं तरी त्या मानाने सोपं असतं. मुलांनी सावध राहण्यासाठी त्यांना तयार करता येतं. पण त्यांच्याच मनात जेव्हा वेगवेगळ्या भावना यायला लागतात, आणि हे चूक कि बरोबर? चांगल कि वाईट? आता मी कसं करू? कोणाला सांगू? या भावनेचा निचरा कसा करू? अशी भावनिक वादळं घोंगावू लागतात, तेव्हा मुलं जरा वेडंवाकडं वागण्याची शक्यता जास्त असते. अश्या वेळी पालकांनी हुशारीने मुलांवर त्यांना कळणार नाही अश्या बेताने बारीक लक्ष ठेवून त्यांना वेळोवेळी मानसिक, भावनिक आधार दिला पाहिजे. शास्त्रीय तसंच सामाजिक दृष्टिकोनातून सगळे विषय उलगडून दिले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट पालकांनीच केली पाहिजे असे नाही. कोणी जाणकार व्यक्ती किंवा त्या विषयातील तज्ञाचीही मदत घेता येईल. अनेक गोष्टी आपोआप मुलांच्या लक्षात येत असतातच. पण त्यांच्या समजशक्तीला योग्य दिशा देण्याकडे पालकांचा कल असावा.

विख्यात मानसशात्रज्ञ अल्बर्ट एलिस यांचं एक वाक्य आठवतं. ''निसर्गदत्त भावना असणं, त्या तीव्र असणं, हे समजू शकतो.ते होतच असतं. पण प्रगत अश्या मानवी समाजाचा हिस्सा म्हणून आपल्या भावना जर आपण कोणावर लादल्या, किंवा त्यामुळे कोणाला त्रास होईल, समोरच्या व्यक्तीचा अवमान होईल, असे वर्तन आपल्याकडून घडले, तर ते स्वीकार्य नाही. तो गुन्हा ठरतो.'' सुरुवातीला हा बॅलन्स जमवणं कितीही अवघड वाटलं, तरी एक सभ्य, प्रगतिशील व्यक्ती म्हणून आपली जडणघडण झाली तर हेही अगदी सुरळीतपणे आणि सहज जमून जातं. नाही का?

आपल्या मुलांना त्यांच्या भावना मोकळेपणाने स्वीकारायची ताकद देण्याची आणि त्या भावनांची जबाबदारी घ्यायला शिकवायची जिम्मेदारी सजग पालक म्हणून आपलीच आहे.

#अमिता

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट