दलाई लामा, तिबेट, भारत आणि चीन


 दलाई लामा, तिबेट, भारत आणि चीन.  


 दि. ६ जुलै २०२० रोजी तिबेटियन बुद्धीस्ट समाजाचे सर्वोच्च अध्यात्मिक धर्मगुरू चौदावे दलाई लामा यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केले. या वयातही अतिशय उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभलेले तेनझिन ग्यात्सो(दलाई लामा) तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्याच उत्साहाने, कडवेपणाने शांततामय मार्गाने झुंज देत आहेत.

सगळ्या जगासाठी ध्यान, आत्मिक उंची, आंतरिक शांती, अध्यात्म या प्रवासातील दिपस्तंभ ठरलेल्या या जगावेगळ्या मुत्सद्दी राजकारण्याला जगानेही आजवर तितकाच आदर आणि प्रेम दिलेले आहे. १५४ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. यात नोबेल पारितोषिक, मँगसेसे, टेंपलपन, अमेरिकेचे काँग्रेगेशनल सुवर्णपदक इ. अनेक पुरस्कारांचा सहभाग आहे. 

गेल्या बासष्ट वर्षांत तिबेटियन जनतेच्या मनातला दलाई लामांविषयीचा आदर तिळमात्रही कमी झालेला नाही. २००८ मधे जो स्वातंत्र्याचा उठाव तिबेटमधे झाला त्यावेळी दिडशेहूनही अधिक तिबेटियन तरूणांनी स्वातंत्र्याची आणि दलाई लामांना परत आणण्याची मागणी करत स्वतःला जाळून घेतले. स्वाभाविकपणे अत्यंत जहरी, कुटील, पाताळयंत्री कम्युनिस्ट सत्तेने आता काय होईल या भयाने दलाई लामांना अधिकाधिक दुषणे देऊन, साधूच्या वेशातील लांडगा इ. संबोधनांनी त्यांचा उपमर्द करत, तिबेटी समाजावर अधिकाधिक अन्याय करण्याचे सत्र चालवले. त्यामुळेच वरवर शांत दिसणारा, जगाच्या खिजगणतीतही नसणारा तिबेट दार चार पाच वर्षांनी अत्याचारी चिनी हुकूमशाही विरुद्ध बंद करून उठतो. पण राक्षसी महत्वाकांक्षा आणि शक्ती असणाऱ्या चिनी सरकार आणि सैन्यापुढे ते निष्प्रभ ठरतात. 

परंतु जगभरात दया, क्षमा, करुणा आणि शांतीचा संदेश देताना आपल्या देशातील सत्य परिस्थितीचे वर्णन दलाई लामा सतत विविध जनसमूहांसमोर मांडत असतात. परिणामस्वरूप आता जवळजवळ शंभर देशांमध्ये तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे तीनशेच्यावर गट तयार झाले आहेत. त्यामुळे चीन ज्याप्रमाणे तिबेटातील लोकांना त्रास देत आहे त्याचप्रकारे जगभरात पसरलेल्या तिबेटी समाजाचीही (डायस्पोरा) विविध प्रकारे अडवणूक करत आहे. 

आज तिबेटी भाषा समजू शकणारी तरुण पिढी तिबेटच्या समाजातून नष्टच झाली आहे. चिनी मँडेरिन हीच सक्तीची शिक्षण भाषा झाली आहे. या समाजाने आपली संस्कृती, भाषा, आपला इतिहास, आपले तत्वज्ञान सगळे अडगळीत टाकून देऊन संपूर्णपणे चिनी कम्युनिस्ट आचार-विचारपद्धती स्वीकारावी यासाठी सरकार गेली सहा दशके प्रयत्नशील आहे. संपूर्ण तिबेटी जनजाती, येथील वंशच नष्ट व्हावेत यासाठी अतिशय थंड डोक्याने कुटील चाली खेळल्या जात आहेत. तिबेटमधील वेगवेगळ्या कार्यालयांत काम करण्यासाठी हान वंशाच्या स्मार्ट, सुस्वरूप चिनी तरुणांची निवड केली जाते. आणि त्यांनी तिबेटी मुलींशी लग्न करावीत यासाठी त्यांना भरीस घातले जाते. जेणेकरून नवी पिढी हान वंशीय असेल. आणि तिबेटी समाजाचा नंबर आपसुकच कमी होईल. असा भयंकर आचरट आणि अनैतिक प्रकार गेली अनेक वर्षे चालू आहे. 

 परंतु  या सगळ्याचा फारसा  उपयोग होत नाहीये हे निदर्शनास आल्यामुळे गेली १५-२० वर्षे ते तिबेटच्या धार्मिक बाबींमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर नाक खुपसू लागले आहेत. 

पंचवीस वर्षांपूर्वी पंचेन लामांचा नवा पुनर्जन्म ज्या मुलाच्या रूपाने झाला आहे अशी घोषणा दलाई लामांनी केली, त्या मुलाचे अपहरण चायनीज कम्युनिस्ट पार्टीने केले. पंचेन लामा म्हणजे दलाई लामांच्या खालोखाल ज्यांचा अध्यात्मिक धार्मिक अधिकार असतो असे तिबेटी धर्मगुरू. आज 'गेधून च्योयकी नेमा' नावाची हि व्यक्ती म्हणजेच अपर्हुत पंचेन लामा हे जिवंत असतील तर ३१ वर्षांचे असतील. संरक्षणासाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या या पंचेन लामांचा लहानपणीचा केवळ एक फोटो त्यांच्या अनुयायांकडे उपलब्ध आहे. ’सर्वात लहान राजकीय बंदी’ असे या अपहरणाचे वर्णन मानवाधिकार संघटना करतात. या अपर्हत पंचेन लामांना चीनने जगासमोर हजर केले नाहीच पण आपल्या सोयीच्या अशा नव्या मुलाला त्यांनी पंचेन लामा म्हणून घोषित केले. आज अमेरिकेनेही तिबेटच्या धार्मिकबाबींमध्ये नाक खुपसायला चीनला अधिकार नाही. नव्या दलाई लामांची व पंचेन लामांची निवड हा सर्वार्थाने तिबेटी लोकांचा, अध्यात्मिक संस्थेचा अधिकार आहे हे ठासून सांगत पंचेन लामाना जगासमोर हजर करा अशी मागणी चीनकडे केली आहे. परंतु गेधुन नेमो आणि त्यांचे कुटुंबीय एक सामान्य चिनी नागरिक असून ते शांत, सामान्य चिनी जीवन पसंत करीत आहेत आणि त्यांना कोणी त्रास देऊ नये अशी त्याची इच्छा आहे; असे उत्तर प्रत्येक चीनी प्रवक्ता याविषयी छेडले असताना नेहमी देतो. चीनला सर्व बाजूनी कोंडीत पकडण्यासाठी वापरायचे एक हत्यार इतकाच याचा अर्थ अमेरिकन सरकारसाठी असू शकतो परंतु सर्वसामान्य बौद्ध समाजासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. 

आजपर्यंत अमेरिकेसोबत जवळपास वीस देशांनी चीनच्या झुंडशाहीला भीक न घालता स्वतंत्र तिबेट आणि दलाई लामा यांच्यासाठी आपापल्या पार्लमेंटमध्ये ५० रिझाॅल्युशन्स पास केलेली आहेत. पण हे भयंकर कठीण काम आहे.

आपल्याकडे लोक शेताच्या बांधाच्या मालकीवरून एकमेकांचे गळे चिरायला निघतात, इथे तर एका संपूर्ण देशाच्या स्वायत्ततेचा, सार्वभौमत्वाचा संकल्प करायचा आहे.आणि तेही लाखो लोकांच्या कत्तली, अब्जावधी रूपयांची संपत्ती सहज बेचिराख करणारे राक्षसी महत्वाकांक्षी, दुसर्याची जमीन, जानमाल हडपून जगात दादागिरी करण्यासाठी त्याचा वापर करणारे, गुंड, कम्युनिस्ट चिनी सरकार समोर असताना...

त्याना त्यांच्या गुढग्यावर आणून आपल्याला हवे ते त्यांच्याकडून करवून घेणे हे एक महाकर्मकठीण कार्य आहे.

कोविड नंतरचं जग, म्हणजे विविध देश, जनता, संस्था, सरकारे सर्वच मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास, जगात, देशांत काय घडतं आहे याबाबत जागृत होऊ लागली आहेत. आपापल्या रणनीती बदलून वेगवेगळी जागतिक समीकरणे आजमावून पाहू लागली आहेत. 

१९५९ साली म्हणजे ६२ वर्षांपूर्वी अरुणाचलातील तवांगमार्गे दलाई लामा भारताच्या आश्रयाला आले. भारतीय सैन्यातील शूर सैनिकांनी त्यांना पळून येण्यासाठी मदत केली. तिबेट बळकावण्याची पूर्वतयारी माओ झेडॉंगने १९४९ सालीच सुरु केली होती. कॉम्युनिस्ट क्रांतीच्या विजयानंतर माओच्या साम्राज्यवादाच्या विस्तारवादी आकांक्षांना नवे धुमारे फुटू लागले. गरजेप्रमाणे इतिहासाचा वापर करायचा, इतिहास मोडूनतोडून आपल्याला हवा तसा सोयीने लोकांच्या माथी मारायचा, ही कम्युनिस्ट पद्धत आपल्याला भारतात चांगलीच ओळखीची झाली आहे. त्याची वीषफळे आपल्याला आजही चाखावी लागत आहेत. नाही का? जे चीनने भारतीय कम्युनिस्टांना, काँग्रेसीजनांना शिकवले तेच त्यांनी तिबेटमध्ये प्रत्यक्षात आणले. चिनी-तिबेटी इतिहासाचा, इथल्या समाजाचा, जनजातीच्या मानसिकतेचा, तत्वज्ञानाचा, जीवनपद्धतींचा यापैकी कसलाही विचार मानवतेच्या दृष्टिकोनातून करायची गरज या क्रूर सत्तेला भासली नाही. जो आपल्या आतंकी हव्यासाच्या आड येईल त्याला नेस्तनाबूत करून टाकणे, संपवून टाकणे हीच साधी, सोपी, सरळ नीती त्यांनी स्वीकारली. त्याचा पुरेपूर, सढळ हस्ताने वापर ते आजही करत आहेत. १९८९ साली घडलेल्या तियान्मेन चौकातील कत्तली असोत किंवा आज रोजच्यारोज घडणाऱ्या हॉंगकॉंगमधील घटना असोत, तिथे बळजोरीने केलेली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी असो, किंवा वूहानमध्ये कोरोनाच्या साथीला ज्या अमानवीय पद्धती वापरून आटोक्यात आणले गेले तो सगळा प्रकार असो, चिनी कम्युनिस्ट पार्टी क्रौर्याच्या परिसीमा गाठून जगाला आश्चर्यचकित करायला कधीच चुकत नाही. 

चीन आणि तिबेटच्या संस्कृतींचा अभ्यास करता त्यांच्यात काही साम्य नाही हे पदोपदी जाणवते. याउलट अनेक भारतीय परंपरांशी तिबेटी पद्धती बहुतांशी मिळत्याजुळत्या आहेत. चीन राजेशाही, साम्राज्यवादी तर तिबेट पुनर्जन्मांवर विश्वास ठेवून दलाई लामा, पंचेन लामांना आपली प्रमुख धारा मानून चालणारा.! चिनी समाजाला विविध काळांत जसा बंडाळ्या, उठाव यांचा अनुभव आहे तशी काही परिस्थिती  तिबेटियन समाजाची नाही. त्यांनी कधी या धार्मिक व्यवस्था किंवा राजकीय यंत्रणेविरुद्ध बंड पुकारल्याचे ऐकिवात नाही.   

आपल्या विस्तारवादी धोरणाच्या अंतर्गत आज चीनचे २१ देशांशी सीमावाद आहेत. ही बाब PLA आणि CCP ला एखाद्या शौर्यपदकाप्रमाणे मिरवावीशी वाटते. हे भारतासाठी काळजीचे कारण नाहीये का? अश्या बिकट परिस्थितीत आधीच गिळलेला घास या चिनी ड्रॅगनला ओकायला लावणे म्हणजे भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणण्याइतके कठीण.. नाही का?

चायनीज कम्युनिस्ट पार्टी आणि आणि चिनी सैन्य विविध भूभाग गिळंकृत करण्यासाठी वेगवेगळॆ पैंतरे अजमावत असतात. कधी तुमचे संरक्षण करायचे म्हणून, कधी खऱ्याखोट्या  इतिहासाचा दाखले द्यायचे तर कधी जो परकीय भूभाग दुर्लक्षित आहे, जिथे त्या देशाच्या सैन्याचे अस्तित्व नाही तिथे विना परवानगी जाऊन आर्मी पोस्ट उभारायची, तळ ठोकायचा आणि एक दिवस ती जमीन आमची आहे असे घोषित करायचे, भांडण झाले तर अतिक्रमण कैलेल्या दहा किलोमीटरपैकी दोन किलोमीटर मागे सरकायचे आणि ती जमीन खिशात घालायची. अशा विविध माकडउड्या चिनी सैन्य, मुत्सद्दी आणि चिनी सरकार मारत असते. अक्साई चीन हा भारताने असाच गमावलेला भारतीय भूभाग नाही का?  दक्षिण चिनी समुद्रातही चिनी आरमाराची अशीच अरेरावी पाहायला मिळते. आजूबाजूचे सगळे शेजारी देश या ओरबाडीमुळे त्रस्त झाले आहेत. 

१९४९ साली  तिबेटमध्येही त्यांनी असाच शिरकाव केला. चिनी सैन्य तिबेटला गुलाम बनवायला नाही तर त्यांचे संरक्षण करायला, तिबेटी समाजाला गरिबी, अशिक्षा, प्रतिगामी सामाजिक मूल्ये यांपासून मुक्त करण्यासाठी तिबेटमध्ये शिरत आहे अशी बतावणी करत माओने आपले सैन्य तिबेटमध्ये घुसवले. सुरुवातीला जागोजागी या सैन्याकडे कुतूहलाने पहिले जाई, त्यांचे स्वागतसत्कार होत असत. 

जेव्हा ‘माओइस्ट चीनचे सैन्य’ जवळजवळ लाखभर होते, तेव्हा जमिनीतील गांडुळालाही जगण्याचा हक्क आहे, ते आपल्यी गेल्या जल्मीची आई असू शकते अशी भाबडी भावनिकता ज्या समाजाची आहे अश्या तिबेटकडे मात्र तुटपुंज्या युद्धसामग्रीनिशी केवळ ७ ते ८ हजार सैनिक होते. त्यामुळे हार पत्करण्यावाचून, मागे फिरण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. लवकरच ल्हासामधील तिबेटी सरकारच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. सगळ्या महत्वाच्या चौक्या, शहरांची नाकेबंदी सुरु केली. शेकडो हजारो तिबेटी नागरिक चीनविरुद्ध उठाव करताना, युद्ध करताना, तसेच काही खायला न मिळाल्यामुळे भुकेने तडफडून मरू लागले. तिबेटच्या एकूण राजकीय कैद्यांपकी निम्मे कैदी बुद्धिस्ट साधू आणि साध्वी होते. या काळात सहा हजारांहूनही अधिक बौद्ध मठ नष्ट करण्यात आले. यात धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असे अनेक पुरातन बौद्ध विहारही होते. म्हणजे इथली अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैचारिक धरोहर नष्ट करण्याचा चंगच चायनीज कम्युनिस्ट पार्टीने बांधला होता.  म्हणजे एखाद्या गुंडाने माझ्यापासून तुम्हाला संरक्षण हवे असेल तर मला खंडणी द्या, असे म्हणण्यासारखाच हा प्रकार झाला.

 ज्याप्रमाणे भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना ज्या प्रकारे आर्मीची भारताला गरज नाही; भारत शांतताप्रिय, तटस्थ देश असल्यामुळे भारतावर कोणी हल्ला करणार नाही अशी धुंदी होती, तसाच काहीसा प्रकार तिबेटबाबत झाला असावा. या वैराण वाळवंटी, बौद्ध देशाला कशाला कोण नुकसान पोचवेल? अश्या कल्पनेपायी मुत्सद्दी तिबेटी सैन्याधिकाऱ्याची तिबेटी सैन्य शस्त्रसज्ज व युद्धसज्ज करण्याची सूचना फेटाळली गेली होती. आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम आजही तिबेट भोगतो आहे. तर मे १९५१ मध्ये १७ पॉईंट करार करण्यात आला. त्यात दलाई लामांचे मूळ गाव अँमडो आणि निम्म्याहून अधिक भूभाग चीनने गिळंकृत केला. आणि तिबेटची प्रभुत्ता चीनच्या हातात गेली.

ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी भारतात रेल्वे, शिक्षण वगैरे व्यवस्था स्वतःच्या फायद्यासाठी उभारल्या तद्वतच चीनी सैन्याने सुधारणा, विकासाच्या नावाखाली तिबेटमधे धुमाकूळ घातला. करारात शांततापूर्ण मार्गाने तिबेटचा कारभार चालवण्याचे घोषित केले. पण प्रत्यक्षात काय झाले? दहा लाख तिबेटी नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. भयंकर हत्याकांडे झाली. तिबेटी लोकांनी स्वातंत्र्यासाठी चालवलेली चळवळ संपूर्णपणे चिरडून टाकण्यात आली. १९५४ साली पंचशील करार झाला. त्यात तिबेटला जेन्युइन अँटाॅनाॅमी देण्याचे चीनने मान्य केले होते. जे प्रत्यक्षात कधीच घडले नाही. कागदावर मान्य केलेला कोणताही वायदा कधी प्रत्यक्षात आला नाही. अक्षरशः जीव मुठीत धरून दलाई लामांना भारतात यावे लागले. जे कागदावर मान्य केले त्याच्या बरोब्बर उलट वागायचे अशीच चीनची नीयत आहे, हेच चीनचा इतिहास आणि वर्तमान सांगतो. तिबेटवर चीनचे अतिक्रमण हा मानवी सभ्यतेचा निघृण असा काळा इतिहास आणि वर्तमानही आहे. 

चीनचे अंतिम उद्दिष्ट नक्की काय आहे? याविषयी विचार मांडताना जाणकार म्हणतात, चीन भारताला आपल्या बरोबरीचा किंवा शत्रू म्हणून पाहतच नाही. संपूर्ण भारतीय उपखंड, त्याहून पुढे जाऊन आशिया खंड, येन केन प्रकारेण चिनी अधिपत्याखाली आणण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू आहे. त्यामुळे गलवान खोऱ्यात दोन पावले पुढे गेले आणि चार पावले मागे फिरावे लागले तरी त्याने त्यांना काही फारसा फरक पडत नाही. सैन्यशक्ती, मुत्सद्देगिरी(प्रामुख्याने भ्रष्टाचार आणि प्रोपगँडा), चिनी आरमार, यांचा पुरेपूर वापर करून, बऱ्याच ठिकाणी समोरच्या देशाला आर्थिक गुलामगिरी स्वीकारायला लावून विविध देशांना आपल्या अंकित करून घ्यायचे आणि जगातील सर्वात मोठी महासत्ता बनायचे. अमेरिका, जपान, युरोपीय देशांना मजबूत टक्कर द्यायची. पृथ्वीतलावरील साधनसंपत्ती केवळ स्वान्तसुखाय ओरबाडून घ्यायची हेच चिनी कम्युनिस्ट पार्टीचे तत्वज्ञान आहे. 

भुगोलाचा थोडा अभ्यास करता आपल्याला असे लक्षात येते की उत्तर भारतातील सर्व प्रमुख नद्या तिबेटमधे उगम पावतात आणि भारतीय उपखंडामार्गे समुद्राला मिळतात. त्यामुळे भारताचा पाण्याचा प्रमुख स्त्रोत एका अर्थाने तिबेट आहे जो आज चीनच्या ताब्यात आहे. आता चीन या सगळ्या नद्यांवर अवाजवी धरणे बांधत आहे. भारतात ओला व सुका असे दोनही दुष्काळ घडवून आणू शकेल अशा क्षमता विकसित करतो आहे. हे भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे.

आपण चीनमधलेच एक उदाहरण घेऊ. 

इतक्यात आपल्याला चीनमधील 3 गाॅर्जेस धरणाविषयी बर्याच वेळा ऐकायला मिळते आहे. हे धरण चीनमधल्या हुबे प्रांतातील यांगत्सु नदीवर बांधण्यात आले आहे. हे जगातील अतिप्रचंड धरणांपैकी एक धरण आहे. २००६ साली जेव्हा हे धरण बांधून पूर्ण झाले तेव्हा धरण बांधणार्या कंपनीकडून हे धरण दहा हजार वर्षांतील सर्वात मोठा पूरही थोपवू शकते असा दावा करण्यात आला. दोनच वर्षांत म्हणजे २००८साली आलेल्या पुरामुळे या प्रतिपादनामधली हवा निघून गेली. मग त्यांनी आपला क्लेम १००० वर्षांवर आणला.

पण काहीच काळात या धरणासाठी वापरलेले स्टील आणि सिमेंट योग्य नसल्याचे ध्यानात येऊ लागले. वरून घेतलेल्या फोटोंमधे हे धरण वाकडेतिकडे झाल्याचे स्पष्ट दिसते. मग कंपनी १०० वर्षांतील सर्वात मोठा पूर थोपवण्याचा वायदा करू लागली. या वर्षी नेहमीपेक्षा अधिक जलवृष्टी झाल्यामुळे या धरणाची दारे उघडण्यात आली. आज तिथले लाखो लोक विस्थापित झाले आहेत. एक लाखांहूनही अधिक घरे पुराच्या पाण्यात कोलमडून पडली आहेत. बाकी प्राणी, निसर्ग, लोकांच्या गाड्या, शेती इ. नुकसानीची तर गणतीच नाही.

अजून महत्वाचा नवीन विवाद असा की WHO तर्फे वुहान व्हायरसच्या उत्पत्ती आणि संक्रमणावर अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांचे तपासपथक येऊ घातलेले असतानाच हा महापूर आला आहे. त्यामुळे हा अतिवृष्टीचा परिणाम नसून चीनी राजवटीची सगळे पुरावे नष्ट करण्याची, तपासपथकाला थोपवण्याची खेळी आहे असेही म्हटले जाऊ लागले आहे.

चीनी राजवट जर स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षेची पर्वा करीत नाही तर भारत, म्यानमार, बांग्लादेशी नागरिकांची काळजी ते काय करतील?

अशा परिस्थितीत न पाळलेले करार, फिरवलेले शब्द, अराजकतावादी पद्धतीने आपले वर्चस्व प्रस्थापित करून जगातील देशांना घाबरवून त्यांच्याकडून आपल्याला जे हवे ते करवून घेणार्या चीनला भारत सरकार आज डोळे दाखवत असेल तर ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे.

२००३ साली तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींनी सिक्कीम भारताचा भुभाग आहे हे मान्य करण्याच्या बदल्यात तिबेट हा चीनचा भाग आहे याला मान्यता दिली असे म्हणतात. आता यावर बरीच चर्चा होऊ शकते. पण चीनचे स्वप्न अक्साई चीन, नेपाळ, सिक्कीम, भुटान आणि अरूणाचल यांना काबीज करण्याचे आहे. यातल्या नेपाळला तर त्यांनी आपल्या खाकोटीस मारलेच आहे. अक्साई चीनवरही अनाधिकृत कब्जा केला आहे. भुटान मात्र भारताच्या मदतीने चीनसमोर कडवेपणाने उभा आहे. चीनला त्याच्याच भाषेत उत्तर आता आपण देतो आहोत. इतक्यातच जी ५९ अँप्स भारत सरकारने बँन केली त्यापायी या कंपन्यांना कमीतकमी पन्नास अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत आहे. आणि हे लोण जगभर पसरले तर चीनच्या पंखांना गळती लागायला वेळ लागणार नाही.

'धर्म ही अफूची गोळी आहे' या वाक्याची अफू खाल्लेले कम्युनिस्ट सज्जन चीनकडून मिळणारी प्रत्येक सुचना जीवाची बाजी लावून पाळतात. पण राष्ट्रवादाचं, पौरुषार्थाचे बाळकडू मिळलेले, आपल्या समाजासाठी, पुढील पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी समर्थ नेतृत्व निवडलेले देशभक्त भारतीय यांचा धुव्वा उडवतात. हे दृश्य प्रमुख प्रसार माध्यमेच नव्हे तर जागोजागी सोशल मिडियावरही पहायला मिळत आहे. 

आज चीनी सैनिक गलवान नदीच्या खोर्यातून मागे जात आहेत अशी बातमी आहे. ही एकशेतीस करोड भारतीयांची जीत आहे असेच म्हणायला हवे.


अमिता आपटे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट