quality_time

#quality_time
आज एक अतिशय सुंदर पोस्ट एका पालक आणि संगोपन या विषयातल्या गटात वाचायला मिळाली. एका अतिशय गरीबीतून वर येऊन प्रसिद्ध झालेल्या चित्रकाराला त्याची गरिब, अशिक्षित आई कसे प्रोत्साहन देत असे, आणि केवळ दोन शब्दांनी आणि कृतीतून कसा सपोर्ट मिळवून देत असे, त्याचे उदाहरण देऊन क्वालिटी टाईम ही संकल्पना सुंदर पद्धतीने त्यात मांडली होती. 
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धरी अशी म्हणच आहे. ही म्हण आईपणाची महती सांगायला म्हणून आपण वापरतो. पण आईपण म्हणजे केवळ जल्माला घालणे, खाऊपिऊ घालणे असा अर्थ न घेता सजग आणि कृतीशील पालकत्वात अपेक्षित अत्युत्तम परिस्थिती घडवण्याची ताकद असते असा घेतला पाहिजे.
आणि पालक म्हणजे काही फक्त आईवडील असतात असे नाही. मुलांना वेळ देणारे, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून 'त्यांच्या फ्रिक्वेन्सीवर' त्यांच्याशी संवाद करणारे शिक्षक, शेजारी, आत्या, मामा, मावशी, आजी-आजोबा हे सगळे लोक आपल्या मुलांना घडवत असतात.  या विषयावरचे 'how to speak so kids will listen and listen so they can speak- Adel Feber' यांचे पुस्तक अगदी वाचनीय आहे.
लौकिक शिक्षणात अगदी अपयशी ठरलेल्या आईनस्टाईनची आणि त्याच्या आईची जीवनकहाणी आपल्या सर्वांनाच माहिती असते. मुलांना प्रोत्साहन देणं, अनेक विषयांशी, खेळांशी, माणसांशी, भाषा-संस्कृतींशी, जागतिक घडामोडींशी, पुस्तकांशी त्यांची ओळख करून देणं हे आपल्या सर्वसामान्य धकाधकीच्या जीवनातही शक्य आणि आवश्यक दोन्हीही आहे. पण तसं intension, orientation आपण ठेवायला हवं. आणि ते मुलांच्या वाढीच्या विविध टप्प्यांत टिकवायला, वापरायला आणि वाढवायलाही हवं.
रोजच्या व्यावहारिक जीवनाची त्यांची तोंडओळख अगदी लहानपणापासूनच व्हायला हवी. म्हणजे दोन वर्षांच्या मुलाने आपल्या हाताने जेवावे. तर सहा वर्षाच्या मुलाने घरातल्या पाळीव प्राण्याच्या खाण्याचे बाऊल नेण्याआणण्याचे काम करावे. कोणतीही वस्तू वापरून झाली की योग्य जागी परत ठेवणे, आपला कप्पा, दप्तर 'छान' आवरणे इ. गोष्टी मुलांना बरोबरीला घेऊन हसत खेळत शिकवता येतात. आठदहाव्या वर्षापासून रोज न चुकता अंथरूण आवरणे, जेवणाची पाने घ्यायला मदत करणे, झाडांना पाणी घालणे अशी कामे मुलांना सांगावीत. गरजेला बाजारात जाऊन दूध, मिरच्या इत्यादी वस्तू आणणे, ATM मधून पैसे काढणे इ. गोष्टी त्यांनी सहजपणे करायला हव्यात. अजून पुढे, छोटे मोठे फाॅर्म्स भरणे, चेक, पे ईन स्लीप भरणे इ. कामे ही त्यांच्या कडून करून घेता येतात. अशा शेकडो गोष्टी आपल्या नजरेला पडतील. प्रत्येक घरची परिस्थिती वेगळी, कामे वेगळी! कधीकधी अनेक कामे नाईलाजास्तव, आवश्यकता म्हणून मुलांना करावी लागतात. अशा वेळी ही परिस्थिती होकारात्मक पद्धतीने स्विकारण्याची शिकवण पालकांनी आपल्या बोलण्यातून, प्रतिक्रियांतून मुलांना द्यावी. 'Life is beautiful' नावाचा एक सुंदर पिक्चर आहे. पाहिला नसेल तर जरूर पहा.
 या गोष्टी सहजगत्या झाल्या, हे तर मुलानी करायलाच हवं, असा दृष्टिकोन ठेवून सांगितल्या गेल्या तर त्या अंगवळणी पडायला मदत होते. आणि मुलांनाही खर्या व्यावहारिक जीवनाची सवय, जाणीव होते. व्यावहारिक जगापासून शैक्षणिक जीवन फारकत घेऊ लागलं की स्ट्रीट स्मार्टनेस अंगात बाणवणे, छोटी मोठी आव्हाने अंगावर घेणे इ. मोठ्या वयात कठीण जाते. अशा छोट्या छोट्या आघाड्यांवर मुलांना मिळालेल्या यशाचे फार कौतुक न करता केवळ आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत याची खात्री मुलांना वाटावी अशा प्रकारची संयत प्रतिक्रिया पालकांची असावी, असे बालमानसशास्त्र सांगते. 
आता अशा सगळ्या गोष्टी मुलांकडून करवून घ्यायच्या, त्यांना शिकवायच्या म्हणजे पालकांची किती मानसिक, बौद्धिक गुंतवणूक यात होत असेल बरे!? 'क्वालिटी टाईम' म्हणजे हेच तर असतं. त्या वेळात पालकांचं मन मुलांच्यात गुंतलेलं असणं, आणि या मिळणाऱ्या अटेंशनचा नैसर्गिक फायदा मिळून ते मूल मानसिक, बौद्धिक इ. स्तरांवर सजग, सखोल होणं हेच तर अपेक्षित आहे ना!
क्वालिटी टाईम म्हणजे आठवड्यातले, दिवसातले काही तास, मिनिटे मुलांजवळ असणं, त्यांच्याशी बोलणं अशी थोडी कृत्रिम वाटेल अशी संकल्पना काही लोकांची असते. रोजच्या धकाधकीच्या, रूटीन आयुष्यात काही प्रमाणात हा फंडा काही लोकांना उपयोगीही पडतो. पण असा ठरवून, विशिष्ट वेळ न देणारे पालक मुलांना 'क्वालिटी टाईम' देत नाहीत का? खरं सांगायचं तर मुलांना सकाळी उठवताना, त्यांना आवरून तयार करताना, खायला देताना, रात्री बेडमधे टक ईन करताना, आपण त्यांच्या वर कळत, नकळत जी मायेची पखरण करत असतो त्याची बरोबरी कशाशी करणार?
0-10 वयाच्या मुलांना दिवसाभरात आईवडीलांनी अनेकवेळा स्पर्श करावा असं म्हणतात. कधी भरवायच्या निमित्ताने तर कधी तेल लावायचं म्हणून. कधी मलमपट्टी करताना, तर कधी केस विंचरताना. कधी व्यायाम करून घेताना, खेळताना तर कधी धपाटा घालताना..  स्पर्शाने मुलं सुखावतात. त्यांना सुरक्षित वाटतं. त्यांची attension ची need भागवली जाते. तसही मुलं एखाद्या टिपकागदासारखी असतात. आजुबाजुला जे घडेल, जे अनुभवता येईल, पहायला, ऐकायला मिळेल ते सगळे मेंदूत शोषून घेत असतात. आपापल्या परीने त्याचे अर्थ लावत असतात. आईबाबाच्या नजरेतले भाव, शब्दोच्चारांतला फरक, आवाजातले चढउतार यावरूनही मुलं पालकांना काय म्हणायचे आहे ते ओळखू शकतात. अशी तरलता अंगी बाणवण्याची संधी आपण मुलांना द्यायला हवी. स्पेस देणे ही एक मोठी संकल्पना आहे. त्यातलाच हा एक उपपदर आहे. 
एकंदरीत काय!? तर क्वालिटी टाईम या संकल्पनेचं अवडंबर न माजवता, रोजच्या आयुष्यात सहजपणे मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व प्रकारच्या 'नैसर्गिक वाढीला केंद्रबिंदू ठेवून' बालकपालक सहजीवनाचा अकृत्रिम आस्वाद घेतला तर बाकीच्या आयुष्यातले ताणतणावही विसरले जातात. कौटुंबिक आनंदात वाढ होते. आयुष्यरेषा वाढते. मुलांची निकोप आणि सकस वाढ व्हायला मदत होते. सगळं 'आयुष्यच क्वालिटी टाईम' होऊन जातं. 

#अमिता आपटे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट