The Crown
मुळात हि कथा इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्या आयुष्याची कहाणी आहे. आणि मग यात तिचे आई-वडील, म्हणजेच तिच्या आधीचे राजा राणी, तिची बहीण, तिचे मोठे काका म्हणजेच पूर्व राजा - एडवर्ड द फोर्थ, नवरा, मुलं, इंग्लंडचं सरकार, जागतिक अर्थकारणाची, राजकारणाची बदलती परिस्थिती, आधुनिकीकरणाचे जगावर होणारे परिणाम, (monarchy/ dynastic राजकारणाची) घराणेशाहीची किंवा एकाधिकारशाहीची कोसळत जाणारी भिंत, bloodlineचे कमी होत जाणारे अवाजवी महत्व, नोकरशाहीच्या करामती, इंग्लंडच्या किंवा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देशांचे स्वतंत्र होणे, आपला एकाधिकार वाचवण्यासाठी ब्रिटिश करत असलेली धडपड, राजकारणी खाचाखोचा, अमेरिकेची भुमिका अशी कित्येक उपकथानके आहेत.
राजघराण्याची सर्व उपवस्त्रं कमी अधिक प्रमाणात मालिकेमध्ये धुवायला काढलेली आहेत. मला अजिबात माहित नसलेल्या, ही सिरीयल पाहिल्यावर कळलेल्या काही महत्वाच्या गोष्टी -
१. आपण ख्रिश्चन चर्च असे म्हणतो. म्हणजे नक्की कोण? तर पोप, असं आपल्याला वाटतं आणि ते बरोबरच आहे. पण पोपच्याही वर इंग्लंडची मोनार्क असते किंवा असतो. म्हणजेच ख्रिश्चन मान्यतेप्रमाणे इंग्लंडचा राजा हाच देवाच्या सर्वात जवळचा असतो आणि आणि जगावर राज्य करण्याचा अधिकार त्याला असतो. आपण ज्या लोकशाहीवर जीवापाड प्रेम करतो, तिला जपण्याचा प्रयत्न करतो, सर्वधर्म समभावाचा जप करतो, प्रत्येक व्यक्ती समान असल्याचा धोशा लावतो, या सगळ्याला यात काहीही किंमत नसते. त्यांच्यासाठी येशूचे राज्य टिकावे म्हणून केवळ सध्या, काही काळ जगात चालणारी ही एक यंत्रणा असते. इंग्लंडचा प्रधानमंत्री जेव्हा राणीशी बोलतो त्या सर्व सीन्समधे सोनियाजी आणि पूर्व पंतप्रधानांचा चेहरा डोळ्यांपुढे तरळून गेल्याशिवाय राहत नाही.
२. सिरीज पाहताना शक्तिकेंद्र असणे म्हणजे काय हे कळते. जगाच्या मंचावरची चर्चची भूमिका कशी ठरते याचा अंदाज यायला याची मदत होऊ शकेल.
३. आपल्याला इंग्लंडचे राजघराणे 'रॉयल फॅमिली ऑफ विंड्सर' या नावानेच माहिती आहे. पण हे त्यांचे घेतलेले नाव आहे. त्यांचे खरे 'जर्मन नाव Saxe-Coburg-Gotha' हे होते. पहिल्या जागतिक युद्धानंतर जर्मनांविषयीचा राग लक्षात घेऊन राजा जॉर्ज चौथा याने हे अगदी 'ब्रिटिश आडनाव' धारण केले. आज विन्डसरांची चौथी पिढी राज्यकारभार करते आहे. गांधी, नेहरू घराणी आठवली ना लगेच? काही घोडचुका केल्या किंवा राजकीय भूमिका बदलायची वेळ आली कि सरळ आडनाव बदलायचं आणि सुखनैव राज्यकारभार करायचा.. सोप्पंय..
४. आत्ताच्या राणीचे काका म्हणजे एडवर्ड - द ड्युक ऑफ विंड्सरचे हिटलरशी असलेले संबंध इथे उघडपणे मांडलेले आहेत. हिटरलर आणि नाझी विचारसरणीचे असे अनेक धागे राजघराण्याशी जोडलेले असल्याचे लक्षात येत रहाते. ज्यू लोकांनी हिटलरला थांबवण्यासाठी मदत करण्याच्या विनंत्यांकडे पोपने का आणि कशाप्रकारे तटस्थ राहून दुर्लक्ष केले यामागची भुमिका ही समजायला थोडी मदत होते.
५. अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे जग ज्याला उजवी विचारसरणी समजते ते नक्की काय आहे याचा थोडा अंदाज येतो. आपल्यापैकी अनेक लोक स्वतःला डाव्या विचारसरणीचे नाही म्हंणून उजव्या विचारसरणीचे मानतात. पण याचा अर्थ खूपच वेगळा आहे. आपण 'हिंदुत्ववादी किंवा लोकशाहीवादी' असू शकतो पण आपण उजवे नाही. अश्या अनेक संज्ञा आपल्याला सरळ करून, आपल्या भाषेत मांडायची खूप गरज आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही केवळ एक कथा आहे. इतिहास संशोधन करून बनवलेली सत्यशोधक डॉक्युमेंटरी नाही हे पक्के ध्यानात ठेवावे. आणि हे 'या सिरियल' वरचे माझे विवेचन आहे. The Royal family of Windsors अशी एक डॉक्युमेंटरी स्वरूपाची मालिका पण आहे. तीही याच कथानकाच्या आधारे पुढे जाते. असो.
(आपल्याकडच्या मराठी, हिंदी इतिहासविषयक तद्दन फालतू, टाकाऊ सिरियल्स पहातानाही हे नक्की डोक्यात असू द्यावे.)
अशीच अजून एक मालिका म्हणजे The Last Czar. शेवटच्या रशिअन राजाची गोष्ट. आता अजून एक प्रश्न मनात येतो. कि या सगळ्या गोष्टी इतक्या मोकळेपणाने सामान्य-अतिसामान्य लोकांसमोर का मांडल्या जाऊ लागल्या आहेत? कोणाच्या सोयीने किंवा कोणाला हिरो बनवायचे म्हणून या कथा लिहिल्या गेल्या आहेत? हि माहिती जगात पोचवायच्या मागे नक्की कोणाचं काय उद्दिष्ट आहे?
उत्तरं येता काळ देईलच. तोवर जे पाहायला मिळतंय ते पाहून प्रोसेसिंग करत राहू.. काय!?
#अमिता
#Netflix #The_crown
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा